December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

kdmc

महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण (मेडा) मार्फत केडीएमसीला दोन पुरस्कारांचा बहुमान जाहीर

कल्याण : महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण या संस्थेकडे महापालिकेने ऊर्जा बचतीबाबत केलेल्या उपक्रमांच्या सादरीकरणाला दोन पुरस्कार मिळाले असून, कोविड इनोव्हेशन अवॉर्ड नंतर या पुरस्कारामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, त्यामुळे राज्यपातळीवर महापालिकेस मोठा बहुमान प्राप्त झाला आहे .

मेडा या महाराष्ट्र शासनाच्या नोडल एजन्सीमार्फत म्युन्सिपल सेक्टर, बिल्डींग सेक्टर, हॉस्पिटल सेक्टर यामध्ये उर्जा बचतीबाबत केलेल्या उपाययोजनांची /राबविलेल्या उपक्रमांची माहिती यावर्षीच्या सोळाव्या उर्जा संवर्धन पुरस्कारासाठी सर्व महापालिका स्तरावर मागविण्यात आली होती. महापालिकेच्या विदयुत विभागाने, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली व शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या फॉरमॅटमध्ये उर्जा संवर्धन व वीज बचतीसाठी स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा, जल/मल नि:सारण या विभागामध्ये जे काम केले त्या संदर्भातील माहिती माहे सप्टेंबरमध्ये पाठविली होती. या सादरीकरणाच्या आधारे महाराष्ट्र ऊर्जा अभिकरणाच्या निवड समितीने विदयुत विभागास प्रकल्प सादरीकरणासाठी वेळ दिली होती, त्यानुसार महापालिकेच्या विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत व त्यांच्या सहका-यांनी निवड समितीसमोर केलेल्या प्रकल्प सादरीकरणाच्या आधारे काल दोन क्षेत्रांमध्ये महापालिकेस पुरस्कार जाहिर करण्यात आले,यामध्ये म्युन्सिपल सेक्टरमध्ये सर्टिफिकेट ऑफ मेरीट हा प्रथम पुरस्काराचा बहुमान महापालिकेस काल सायंकाळी जाहिर करण्यात आला. त्याचप्रमाणे हॉस्पिटल सेक्टरमध्ये शास्त्रीनगर हॉस्पिटलसाठी दुस-या क्रमांकाचा पुरस्कार काल महापालिकेस जाहीर करण्यात आला.

महापालिका परिसरात परंपरागत जुने सोडियम दिवे काढून उर्जा बचतीसाठी स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात आले, महापालिकेने नविन इमारतींना सौर उर्जा यंत्र बसविणे बंधनकारक केले आहे, त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १९१० इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविल्यामुळे वर्षाला जवळ जवळ १२ कोटी युनिट विजेची बचत होत आहे, पाणी पुरवठा करणारे जुने पंप बदलून महापालिकेने नविन प्रकारचे उर्जा बचतीचे पंप बसविले, त्याचप्रमाणे शास्त्रीनगर रुग्णालयातही उर्जा बचतीसाठी जुने परंपरागत दिवे काढून एलईडी दिवे तसेच उर्जा कार्यक्षम वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली.

भविष्यात महापालिकेमार्फत इलेक्ट्रीक बसेस चालविण्याचा महापालिकेचा मानस आहे, त्याचप्रमाणे आयरे, कचोरे, बारावे, उंबर्डे या परिसरात घनकच-यापासून जैविक इंधन तयार करण्याचे पाच प्रकल्प उभारण्यात आले. या सर्व माहितीच्या सादरीकरणाअंती काल राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून महापालिकेस हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.