December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

केडीएमसी क्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ,केडीएमसीच्या शाळेत देखील विद्यार्थ्यांचे स्वागत

कल्याण : केडीएमसी क्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळाला असून केडीएमसीच्या शाळेत देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

राज्यातील कोव्हीड-१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शहरी भागातील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दिनांक १ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक २९ नोव्हेंबर च्या शासन परिपत्रकान्वये घेतलेला होता. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शहरी भागातील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग सुरु करण्यासंदर्भात संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीने घेतलेल्या निर्णयानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या, सर्व प्राथमिक/माध्यमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी चे वर्ग शासनाने दिलेल्या कोव्हीड-१९ च्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन आवश्यक ती दक्षता घेऊन १६ डिसेंबर पासून सुरक्षितपणे सुरु करण्याबाबत निर्णय घेतल्यामुळे आयुक्तांनी शाळा सुरु करण्याबाबतचे आदेश पारित केले आहेत.

त्याअनुषंगाने आज पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या. सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी चे वर्ग शासनाने दिलेल्या कोव्हीड-१९ च्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन आवश्यक ती दक्षता घेऊन सुरक्षितपणे सुरु करण्यात आलेले आहेत. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी शाळेच्या पहील्या दिवशी शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थी स्वागतोत्सवात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या , शिक्षकांच्या व पालकांच्या ओसांडुन वाहणा-या आनंदात भर पाडली.

शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी, पालक यांना गुलाबपुष्प देऊन, विद्यार्थ्यांच्या हस्ते फुगे हवेत सोडुन शाळेत नियमित उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. एकंदरीत कोव्हीड-१९ ची विद्यार्थी, पालक यांच्या मनातील भीती दुर करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी केला. तसेच शिक्षकांना शाळा सुरु झाल्याबाबत शुभेच्छा देऊन कोव्हीड-१९ च्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन मुलांना शाळेत नियमित येण्यासाठी प्रोत्साहीत करण्याबाबत सुचना दिल्या असल्याची माहिती केडीएमसी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी जे. जे. तडवी यांनी दिली.