December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

KDMC : कल्याणमधील जीन्स पॅन्टच्या कारखान्यांवर केडीएमसीची धडक कारवाई

कल्याण : कल्याणमधील जीन्स पॅन्टच्या कारखान्यांवर केडीएमसीने धडक कारवाई केली. क प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

जीन्स वॉशिंग कारखान्यांवर केडीएमसीची कारवाई

महापालिका परिसरात अवैधरित्या कार्यरत असलेल्या जीन्स वॉशिंग उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, या अवैधरित्या सुरू असलेल्या जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाई करण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या, कल्याण प्रादेशिक कार्यालयाने शुक्रवारी महापालिकेस पाठवले होते. या पत्राची त्वरित दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अशाप्रकारे अनधिकृतरित्या महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या जीन्स कारखान्यांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त यांना दिले. शनिवारी सकाळी सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे आणि सुधीर मोकल  यांनी विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदवाडी परिसरातील दोन ते तीन हजार स्क्वेअर फुटाचे चार कारखाने ३ जेसीबी आणि प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित करण्याची धडक कारवाई केली.

हा परिसर संवेदनशील असल्यामुळे महापालिकेच्या विनंतीनुसार  या कारवाईसाठी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी त्वरेने उपलब्ध करून दिलेले पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने हे अनाधिकृत कारखाने पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आले.