बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी चोरायचा दुचाकी
डोंबिवली : बायकोसोबत मौज करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने दुचाकींची (Bike) चोरी करुन त्या विकणाऱ्या दीपक सलगरे या चोरट्याला सीसीटीव्हीच्या सहाय्याने मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सलगरे हा आपल्या एका साथीदारासह दुचाकी चोरी करायचा, त्यानंतर त्या फायनान्स कंपन्यांकडून आणल्या असल्याचे भासवून गरजूंना स्वस्त दरात विकायचा. तर काही दुचाकी त्याने भंगारवाल्याला विकल्या होत्या. या टोळीचा पर्दाफाश करत सलगरे याच्यासह 6 जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण डोंबिवली परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली आहे. कल्याण परिमंडळ 3 मध्ये या दुचाकी चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली होती. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या आदेशानंतर मानपाडा पोलिसांच्या पथकाने ज्या परिसरात दुचाकी चोरी झालेल्या, त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहिले. तसेच भंगाराच्या दुकानावरदेखील नजर ठेवण्यास सुरुवात केली.
याच दरम्यान संशयित सलगरे या चोरट्याला अंबरनाथ येथील पालेगाव येथे सापळा रचून अटक केली. त्याने आपल्या साथीदारांसोबत आजपर्यंत मानपाडा, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, नारपोली, उल्हासनगर आणि कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे.
बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने सलगरेने दुचाकींची चोरी सुरु केली होती. साथीदार राहुल डावरे याच्या मदतीने त्या दुचाकी तो ग्राहकांना स्वस्त दराचे आमिष दाखवून विकायचा.
काही गाड्या त्याने भंगार व्यवसाय करणाऱ्या चिनमून चौहान उर्फ बबलू याला देखील विकल्या. बबलू या गाड्या स्क्रॅप करून त्या धर्मेंद्र चौहान, समशेर खान, भैरवसिंग खरवड यांच्यामार्फत इतरांना विकत होता. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अखेर यश मिळवले.
या प्रकरणी सलगरे याच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक करत त्यांचेकडून मानपाडा पोलिसांनी 17 दुचाकी, 23 दुचाकींचे इंजिन आणि इतर पार्ट्स, एक कटर मशीन असा 8 लाख 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
स्वस्त दुचाकीच्या आमिषाला बळी पडून चोरी केलेल्या दुचाकी विकत घेऊ नये, असं आवाहन पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी नागरिकांना केलं आहे.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण