December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

मूलभूत सुविधांपासून वंचित आदिवासी बांधवांचा कल्याण प्रांत कार्यालयावर निर्धार मोर्चा

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार – श्रमजीवी संघटनेचा इशारा

कल्याण : मुरबाड तालुक्यात आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. आदिवासी बांधवाना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज शेकडो आदिवासी बांधवांनी कल्याण प्रांत कार्यलयावर निर्धार मोर्चा काढत कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष उलटली. मात्र, आजही आदिवासी बांधव त्यांच्या मूलभूत हक्क व अधिकारापासून वंचित असल्याची खंत यावेळी आदिवासी बांधवांकडून व्यक्त करण्यात आली. श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रामभाऊ वारणा, महाराष्ट्र राज्य जनरल सरचिटणीस बाळाराम भोईर, ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, शेतकरी सचिव सुरज रजपूत, कल्याण तालुका अध्यक्ष वासुदेव वाघे, विष्णू वाघे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने आदिवासी माहिला आणि पुरुष मोर्चात सहभागी झाले होते.

वनजमीनीचा कायदा होऊन १५ वर्ष उलटले. मात्र, अद्यापही आदिवासी बांधवाना हक्क मिळाला नाही. आजही मुरबाड येथे २८२ तर कल्याण येथे २०७ दावे प्रलंबित आहेत. अन्न अंतोदय योजनेसाठी आदिवासी बांधवांना सामावून घेत त्यांना या योजनेचा लाभ घ्यावा. अन्न अंतोदय, द्वितीय अन्न अंतोदय, तृतीय अन्न अंतोदय योजनेची प्रभावी अमलबाजवणी करावी. ऑनलाइन न झालेल्या शिधापत्रिका धारकांना ऑफलाईन धान्य द्या., शासकीय आकारपड गुरचरण प्राधिकरण खाजगी व वनजमिनीमध्ये असलेल्या आदिवासी कुटुंबाची घराखाली जागा नावे करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा.,

आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेतच जातीच्या दाखल्याचे कॅम्प आयोजित करा. १९५० पूर्वीची जाचक अट शिथिल करत आदिवासी कुटुंबाना जातीचा दाखला देण्याची तत्काळ व्यवस्था करा. आदिवासी पाड्यांना शुद्ध मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आदी मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यलयाला श्रमजिवी संघटनेने सादर केले. यावेळी मागण्या मान्य झाल्या नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.