नागरी समस्या न सोडविल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा
कल्याण : मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून त्या ठिकाणी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कर माफीची घोषणा सरकारने केली आहे. केडीएमसीमध्ये शिवसेनेचीच सत्ता असून याठिकाणी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी न देता किमान जी २२ टक्के कर वाढ केली आहे ती मागे घेण्याची मागणी जागरूक नागरिकच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे. तसेच इतरही अनेक समस्या असून त्या ५ जानेवारीपर्यंत न सोडविल्यास १० जानेवारी पासून जागरूक नागरिकच्या वतीने बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
जागरूक नागरिकने ५०० फुटापर्यंतच्या सदनिकांचा कर माफ करावाची मागणी कुठेही केलेली नाही. कल्याण-डोंबिवली च्या नागरिकांना जो २२ टक्के वाढीव कर भरावा लागत आहे तो माफ करावा अशी आपली मागणी आहे. मुळात विकासक आणि बिल्डर यांना त्यांच्या ओपन लँड टॅक्स मधून सवलत मिळावी म्हणून पालिका प्रशासनाने आधीच जमिनींचा रेडीरेकनरचा दर ६४.३५ टक्के कमी केलेला आहे. हा कमी केलेला रेडीरेकनरचा दर नागरिकांच्या मालमत्ता कराला सुद्धा आपोआपच लागू होतो. त्यामुळे आत्ता जी बिले नागरिकांना मिळालेली आहेत ती बिले चुकीची असून त्यातही ६४ टक्के सवलत नागरिकांना मिळणे भाग असल्याचे घाणेकर यांनी सांगितले.
… तर छेडणार बेमुदत उपोषण
दोन्ही महानगरपालिकेमध्ये सत्ता एकाच पक्षाची असल्याने ही मागणी अत्यंत रास्त आहे. महापालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असेल तर ही ठीक बाब राज्यशासनाने सोसावयास काही हरकत नाही. त्याप्रमाणे कल्याण पश्चिमेस त्वरित कल्याण डोंबिवलीचा म्हणजेच कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व, पश्चिम, मांडा-टिटवाळा, मोहना, २७ गावे येथील ओला व सुका कचरा येऊ नये. या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी त्याचा निचरा ही होणे गरजेचे आहे. यासारख्या मागण्यांवर दिनांक ५ जानेवारी पर्यंत कोणताही तोडगा न निघाल्यास दिनांक १० जानेवारी पासून “जागरूक नागरिक” बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा श्रीनिवास घाणेकर यांनी दिला आहे.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण