April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

KDMC आयुक्तांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा

कल्याण : स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय विद्यालय व सैनिक शाळा यामधील प्रवेश परीक्षेसाठी महापालिकेच्या शाळांनी विशेष प्रयत्न करावेत, असे उद्गार kdmc आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत आढावा घेण्यासाठी २५ होतकरू शिक्षकांसमवेत व शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी हे उद्गार काढले.

       या बैठकीत आयुक्तांनी उपस्थित शिक्षकांकडून ते शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबाबत सविस्तर माहिती घेतली. सर्व शिक्षकांनी आपापल्या शाळेत राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी सादर केली. शिक्षकांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता व सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून राबवायच्या उपक्रमाबाबत आयुक्तांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. या बैठकीस शिक्षण विभागाचे उपायुक्त कदम, प्रशासन अधिकारी जे. जे. तडवी तसेच सर्व विस्तार अधिकारी व २५ शिक्षक उपस्थित होते.

        विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसून मार्गदर्शन करावे, शाळा-शाळांमध्ये “गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढव” हा उपक्रम राबवावा. सर्व शाळांनी शाळेची वैशिष्ट्य दर्शविणारी माहिती पत्रके तयार करून ते प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या दारी पोहोचवावे. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती नष्ट करण्यासाठी गणिततज्ञ शिक्षक तयार करावेत, विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारण्यासाठी शाळेत अक्षर सुधार उपक्रम राबवावेत, शिक्षकांनी स्वतः तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवावे, गुणवत्ता वाढीसाठी दत्तक मित्र योजना राबवावी.

सैनिकी शाळा, नवोदय विद्यालयामध्ये महापालिका शाळेचे विद्यार्थी प्रविष्ट होतील या दृष्टीने नियोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक मूल्ये रुजविण्यासाठी शालेय परिपाठामध्ये विविध बाबींचा समावेश करावा. डिजिटल शाळा अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सर्व शाळांना वायफाय सुविधा उपलब्ध कराव्यात. शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी तयार करून शाळा स्तरावर अशा विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करावे. सर्व शिक्षकांना त्यांच्या आवडीनुसार विविध विषयाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे. महापालिका शाळांना सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात. सर्व महापालिका शाळांमध्ये ए.बी.एल (ॲक्टिविटी बेस लर्निंग) चे साहित्य पुरवावे. इतकेच नव्हे त्या शाळांच्या नियमित स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत उपस्थित शिक्षकांना केल्या.

विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक विकासासाठी क्रीडा विषय अधिक सक्षमतेने राबविण्यासाठी तसेच सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर येथील शाळांमधील क्रीडा विषयक उपक्रमांची शैक्षणिक उपक्रमांची व्हिडीओ क्लिप उपस्थित शिक्षकांना दाखवली. आयुक्तांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनामुळे सर्व शिक्षकांनी प्रेरित होऊन सर्व उपक्रम शाळेत राबविण्याची हमी दिली.