April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

रेझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांना “सायबर गुन्हे जनजागृती” चे धडे

कल्याण/उल्हासनगर

कल्याण पूर्वेत साकेत महाविद्यालय व विठ्ठलवाडी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेझिंग डे’ या सप्ताहानिमित्त “सायबर गुन्हे” या विषयावर जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेत कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी विद्यार्थ्यांना एटीएमचा पासवर्ड कोणाला शेअर करू नये, अंतरजालद्वारा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असा सल्ला दिला. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बराटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण व खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. यासोबत स्टडी वेल्थ संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक कशी केली जाते याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबर झालेल्या गुन्ह्यांबद्दल चर्चा केली. त्यावर विविध उपाय सांगण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये ज्ञानपीठ शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी साकेत कुमार, सीईओ शोभा नायर, पोलीस निरीक्षक डोके, उपप्राचार्य नवनाथ मुळे, प्रिया नेरलेकर हे उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्राध्यापक संजय चौधरी व आभार प्रदर्शन प्रकाश जाधव यांनी केले.

       सायबर अवेरनेस कार्यक्रम

‘सायबर अवेअरनेस’वर मार्गदर्शन करताना पोलीस अधिकारी

त्याचप्रमाणे सेंट पॉल कॉलेज, आशाळेपाडा याठिकाणी देखील सायबर जागरूकता दिवसाच्या अनुषंगाने “सायबर अवेअरनेस” या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर विषयी विविध समस्यांची, मुद्द्यांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक धनंजय कापरे व स्टडी वेव्हज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी मार्गदर्शन केले.