व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला आणि खंडणी प्रकरण
कल्याण
खंडणी प्रकरणात एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक सचिन खेमा याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील अन्य चार हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.
५ जानेवारी रोजी पहाटे कल्याणमधील व्यापारी अमजद सय्यद यांच्यावर काहींनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सय्यद गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्यात माजी नगरसेवक सचिन खेमा यांचा भाऊ नितीन खेमा, बबलू मजिद, प्रेम चौधरी व सतीश पोकळ या लोकांचा सहभाग होता.
सचिन खेमा याने किरकोळ वादातून एका तरुणाला मारहाण केली होती. या तरुणाला अमजद याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास मदत केली. याचाच राग मनात धरून अमजद यांच्यावर हल्ला करण्यात आला. इतकेच नव्हे तर अमजद यांच्याकडून पैसे मागण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सचिन खेमाच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. सतीश याला आधीच अटक करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी सचिन खेमाला ताब्यात घेण्यात आले. अन्य हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील करत आहेत.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण