December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Lift साठी तयार केलेल्या खड्ड्यात पडून १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू

डोंबिवली

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना डोंबिवलीत घडली आहे. सत्यम मौर्य असे या मुलाचे नाव असून, तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

पूर्वेतील सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगारच्या दुकानात काम करतात. पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असे त्यांचे कुटुंब आहे. मंगळवारी संध्याकाळी सत्यम खेळण्यासाठी बाहेर गेला. जवळपास दोन तास होऊनही मुलगा घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. तासभर शोध घेऊनही सत्यम सापडला नाही. त्यांनी नजिकच्या इमारतीमध्ये जाऊन बघितले, तर इमारतीच्या लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. या पाण्यात सत्यमचा मृतदेह आढळून आला.

मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, निष्काळजीपणा करणाऱ्या विरुद्ध ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे.