December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Dombivali Crime : २० गुन्ह्यात फरार असलेला हसनैन अटकेत

मानपाडा पोलिसांची कामगिरी

डोंबिवली

पाच वर्षापासून फरार असलेला आणि मोक्का लागलेल्या हसनैन गुलाम सैय्यद उर्फ इराणी (२८) या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. या सैय्यद उर्फ इराणी याच्यावर कल्याण डोंबिवलीसह ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, पनवेल, सातारा, पुणे तसेच कर्नाटकमधील बेंगलोर अशा विविध पोलीस ठाण्यात मोटार सायकल, मोबाईल आणि दागिने चोरी या संदर्भातील २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

आंबिवली येथील इराणी वस्तीत सैय्यद उर्फ इराणी फिरत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कोंबिंग ऑपरेशन करून पोलिसांनी सैय्यद उर्फ इराणी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संपूर्ण देशात विविध ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून मोबाईल, मोटार सायकल आणि सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

| जप्त केलेल्या मुद्देमालासोबत मानपाडा पोलीस

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल भिसे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल तारमळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

तीन महिन्यात १३ आरोपी पकडले

मानपाडा पोलिसांनी मागील तीन महिन्यात मोटर सायकल चोरी प्रकरणातील १३ आरोपींना पकडले असून त्यांच्याकडून जवळपास ५० गुन्ह्याची उकल झाली आहे. या सर्वांकडून सुमारे २२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

इराणी वस्ती म्हणजे चोरट्यांचा अड्डा

कल्याण पश्चिमेच्या आंबिवली परिसरात इराणी वस्ती म्हणजे चोरटय़ांचा अड्डा. देशभरातील अनेक गुन्ह्यातील आरोपी या वस्तीत राहतात. अनेकदा पोलिसांनी या वस्तीत छापा टाकून कोंबिंग ऑपरेशन केले आहे. अशी एकही वेळ नाही जेव्हा आरोपी पकडण्यासाठी वस्तीत गेलेल्या पोलिसांसोबत आरोपींचे नातेवाईक आणि वस्तीतील लोकांनी पोलिसांशी वाद घालून झटापट केली नाही.