December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Good Detection : MFC पोलिसांनी ६ सराईत आरोपींना अटक करत २४ गुन्हे आणले उघडकीस

१५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत

कल्याण

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ६ अट्टल गुन्हेगारांना अटक केली. ज्यामध्ये २ महिलांचाही समावेश आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी या गुन्हेगारांकडून चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, मोबाईल आणि मोटारसायकल चोरीचे २४ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून १५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ब्लेडने पिशवी कापून त्या दोघी चोरायच्या ऐवज

आरती दयानंद पाटील आणि शालिनी संजय पवार या दोघी कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मार्केटमध्ये गर्दीचा फायदा उचलत ब्लेडने पिशवी कापून त्यातील ऐवज बेमालूमपणे चोरी करायच्या. पोलीस चौकशीत या दोघीनीही ८ गुन्ह्यांची कबुली दिली असून रोख रकमेसह १५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही MFC पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

सीसीटीव्हीच्या सहाय्याने पकडले मोबाईल चोरट्याला

सीसीटीव्हीत कैद झालेल्या मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्याप्रकरणी आंबिवलीच्या इराणी वस्तीत राहणाऱ्या मुस्सु उर्फ मुस्तफा जाफर संजय सैय्यदलाही एमएफसी पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. त्याच्याकडून चेन स्नॅचिंगचे ३, मोबाईल स्नॅचिंगचे २ आणि मोटारसायकल चोरी आदी ८ गुन्हे उघडकीस आणत ४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २ मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला.

मोटारसायकल चोरणारे अटकेत

पश्चिमेतील काळा तलाव परिसरात रात्रीच्या वेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या साजिद अन्सारी, समीर हाश्मी आणि सलील लुंड या तिघांना अटक करत महात्मा फुले चौक पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेल्या ५ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. तर मोटारसायकल चोरीच्याच गुन्ह्याप्रकरणी आकाश उर्फ आक्या रामदास यशवंते आणि नेत्रा उर्फ जॅक मिलान या दोघांना अटक करून चोरीची महागडी बाईक हस्तगत केली.

MFC पोलिसांची कामगिरी

ही कारवाई महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण, दिपक सरोदे, देविदास ढोले, हनुमंत ओऊळकर, पोलीस हवालदार विजय भालेराव, संदीप भालेराव, पोलीस नाईक सचिन भालेराव, जाधव, टिकेकर, मधाळे, हासे, कांगरे, गामणे, एसीपी स्कॉडमधील हवालदार पवार, पोलीस नाईक श्याम वाघ, गुणवंत देवकर, नरसिंग वळवी आदींच्या पथकाने केली.