December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान

कल्याण

पत्रकारितेच्या क्षेत्रात आपले जीवन खर्ची करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे सन्मानित करण्यात आले. तर, दुर्धर आजाराशी झुंजणाऱ्या अंबरनाथमधील पत्रकाराला फाउंडेशनतर्फे आर्थिक मदतही करण्यात आली.

कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांची संघटना असणाऱ्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित या महिन्यातील ६ जानेवारीचा पत्रकार दिनाचा सोहळा वाढते कोरोना रुग्ण पाहता सामाजिक भान राखत रद्द करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान विविध मान्यवरांच्या हस्ते या ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात येणार होता. मात्र, हा सोहळा रद्द झाल्याने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून फाउंडेशनतर्फे या ज्येष्ठ पत्रकारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ज्यामध्ये दामुभाई ठक्कर (९९ वर्षे) अण्णा अर्थात विनायक बेटावदकर (८१ वर्षे), दिवाकर गोळपकर (७३ वर्षे) आणि संजीत वायंगणकर (६० वर्षे) आदी ज्येष्ठ पत्रकारांचा समावेश होता. या सर्व ज्येष्ठ पत्रकारांना शाल, सन्मानचिन्ह आणि आर्थिक मदतीचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. या सर्व पत्रकारांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव योगदान देण्यासह समाजाला आणि नव्या पत्रकारांना एक नवी दिशा दाखवण्याचे काम केले आहे. याशिवाय गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही किडन्या निकाम्या झाल्याने आजाराशी झुजणाऱ्या अंबरनाथ येथील फोटो जर्नलिस्ट संतोष तिवारी यांच्या कुटुंबियांनाही फाउंडेशनतर्फे आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. पत्रकारांची सहकारी पत्रकारांबाबत असणाऱ्या बांधिलकीच्या उद्देशाने ही मदत करण्यात आली.

यावेळी निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर पगारे, सचिव केतन बेटावदकर, सदस्य प्रशांत माने, निनाद करमरकर, मिथिलेश गुप्ता यांच्यासह अंबरनाथ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पंकज पाटील आदी पत्रकार उपस्थित होते.