April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

‘एक जिल्हा एक उत्पादन’अंतर्गत

नाचणी व भगरवरील प्रक्रिया उद्योगांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे

असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र शासनाने एक जिल्हा एक उत्पादन या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु केली आहे. सन २०२०-२१ ते २०२४-२५ या वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेत ठाणे जिल्ह्यातील नाचणी व भगर उत्पादनावरील सूक्ष्म प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

केंद्र शासनाची अर्थसहाय्य असलेल्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या केंद्र पुरस्कृत योजनेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका उत्पादनाची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यासाठी नाचणी व भगर या उत्पादनाची निवड झाली आहे. या उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जिल्ह्यातील वैयक्तिक लाभार्थी, बेरोजगार युवक, महिला, शेतकरी गट/कंपनी/संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था पात्र आहेत. वैयक्तिक प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपये मर्यादेत अनुदान मिळणार आहे. तर शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी, स्वयंसहायत्ता गट/संस्थांना सामान्य पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीसाठी प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार आहे.

या योजनेत सहभागासाठी www.pmfme.mofpi.gov.in किंवा ग्रामीण भागातील लाभासाठी www.msrim.gov.in व शहरी भागासाठी www.nrim.gov.in या संकेतस्थळावरही अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी विभागाच्या कार्यालयांसाठी अथवा केंद्र शासनाच्या www.mofpi.gov.in किंवा राज्य शासनाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर योजनेची माहिती मिळवू शकता, असे आवाहन नोडल अधिकारी तथा संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन) यांनी केले आहे.

,