इमारतीचा पुनर्विकास फसवणूक प्रकरण
कल्याण
इमारतीचा पुनर्विकास आणि अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत केडीएमसीच्या गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एस. एस. भिसे, ई. रवींद्रन, गोविंद बोडके या पाच माजी महापालिका आयुक्तांसह बिल्डर व आर्किटेक्ट अशा १८ जणांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. तत्कालीन नगरसेवक अरुण गिध यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
पश्चिमेकडील माणिक कॉलनीतील एक इमारत २०१० मध्ये तर दुसरी इमारत २०१२-१३ मध्ये पाडण्यात आली होती. माणिक कॉलनी इमारत पुनर्वसनप्रकरणी केडीएमसी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. निर्धारित नियमांचे उल्लंघन करत मालमत्तेच्या विकासास परवानगी दिली असल्याचा आरोप तत्कालीन नगरसेवक गिध यांनी केला आहे. याबाबत गिध यांनी केडीएमसीसह पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली होती. मात्र, काहीच कारवाई न झाल्याने अखेर गिध यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एसएस भिसे, ई रवींद्रन, गोविंद बोडके या पाच तत्कालीन केडीएमसी आयुक्तांसह, केडीएमसी अधिकारी, संबंधित विकासक, आर्किटेक्ट अशा १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर