December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

सामाजिक संस्थांकडून सफाई कामगारांचा सन्मान 

कल्याण

सफाई कामगार हा समाजातील महत्वाचा घटक आहे. त्यांनी कोरोना काळात न थकता सफाईचे काम सुरूच ठेवले. त्यांच्या कामाचा सन्मान करण्यासाठी हेल्पिग हँड सामाजिक संस्था, तिरंगा जागृती विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभाग २३ मध्ये सफाई काम करणाऱ्या कामगारांचा नुकताच केडीएमसीचे घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सफाई कामगार हे परिसरातील कचरा साफ करत स्वच्छता राखण्याचे काम करतात. त्यामुळे रोगराईपासून नागरिकांचा बचाव होतो. ते करत असलेल कार्य हे महत्वाचे असून अशा कामगारांचे कौतुक करण्यासाठी पश्चिमेतील स्वानंद नगर येथील हजेरी शेड येथे प्रभाग २३ मध्ये सफाईचे काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार करण्यात आला. याचे आयोजन हेल्पिग हँडचे संस्थापक अध्यक्ष सचिन राऊत, तिरंगा जागृती विचारमंचचे अध्यक्ष चेतन म्हामूनकर आणि निलम चौधरी यांनी केले.

प्रभाग २३ मध्ये उत्कृष्ठ सफाई काम करणाऱ्या रितेश राठोड, चिन्नादुराई, हेमा वालोद्रा, जसोदा परमार, कलियन नडेशन आदींचा उत्कृष्ट काम करणारे कामगार म्हणून सत्कार करण्यात आला. मुकादम विनोद चव्हाण आणि राहुल पगारे हे देखील आपले काम चांगल्या प्रकारे करत असून त्यांचा देखील उपायुक्त यांनी सन्मान केला.

कार्यक्रमावेळी माजी नगरसेविका कस्तूरी देसाई, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी घुटे, ‘क’ प्रभागाचे स्वच्छता अधिकारी योगेश जगताप, स्वच्छता निरीक्षक संदीप किस्मतराव, जगन्नाथ वड्डे, दत्ताराम सावंत उपस्थित होते.