ठाणे
ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात अजेय संस्थेच्या तेजायन सोहळ्याचा दुसरा आणि ऑफलाईन भाग पार पडला. लॉकडाऊननंतर ऑफलाईन कार्यक्रमातल अजेंयच हे तिसरं पुष्प.
कवी, लेखक आणि वक्ते आदित्य दवणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. आदित्य यांनी आपल्या निवडक कविता रसिक प्रेक्षकांसमोर प्रस्तुत केल्या तसेच कवीचा प्रवास या आशयाची कविता सादर करून त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल श्रोत्यांशी गप्पा मारल्या. साहित्य विश्वात अजेयमधील अनेक उमदे तरुण कलाकार आणि त्यांना सोबत घेऊन १२ वर्षे वाटचाल करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष गौरव संभुस आणि संस्थापक डॉ. क्षितीज कुलकर्णी यांचे सुद्धा त्यांनी कौतुक केले.
त्यानंतर प्रा. विठ्ठल कुसाळे यांनी काही दिग्गज कवींच्या कविता सादर करून तेजाची अनेक रूपे स्पष्ट केली आणि तेजायनला बहार आणली. काव्य संमेलनात सहभागी असलेल्या कवींनी तेज विषयाला धरून विविध रस असलेल्या स्वलिखित कविता सादर केल्या. त्यानंतर कलाकार चर्चा सत्र रंगले. या सत्रात संगीत संयोजक, दिग्दर्शक पद्मनाभ जोशी, गायिका अमृता खोडके-दहिवेलकर आणि कथ्थक नृत्यांगना भावना लेले उपस्थित होत्या. अजेय संस्थेचे संस्थापक सदस्य आणि कोषाध्यक्ष अवधूत येरगोळे तसेच संस्थेच्या एच.आर. टीम हेड हेमांगी कुलकर्णी-संभुस या सुद्धा चर्चेत सहभागी झाल्या होत्या. या सत्रात विविध कलेतील कलाकार त्यांची जडणघडण, त्यांचे प्रवास, कलेतील शिक्षण, कलाकाराचे सत्व, यश, अपयश इत्यादी विविध घटकांवर चर्चा होऊन त्याच्या अनेक बाजू व कंगोरे उलगडले गेले.
दुपारी अजेय संस्थेचे आगामी व्यावसायिक रंगभूमीवरील नाटक “एका वाक्यात उत्तर” या संस्थेच्या नाटकाच्या टीमतर्फे एक वेगळा प्रसंग सर्व प्रेक्षकांसमोर सादर करून केला.
त्यानंतर तेजानुबंध विभागात सहभागी झालेल्या कलाकारांतर्फे नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, अभिवाचन, कथाकथन, स्वलिखित निबंध तसेच ललित लेख यातून तेज तत्वावर सादरीकरण करून या माध्यमातून तेजाचे अनेक पैलू उलगडले गेले.
समारोप सत्रात व्यास क्रिएशनचे निलेश गायकवाड आणि प्रसिद्ध कवी अशोक बागवे उपस्थित होते. गायकवाड यांनी कार्यक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले. कवी बागवे यांनी भाषेची व्युत्पत्ती, शब्दांचे सुयोग्य अर्थ आणि काव्यांत त्याचे केले जाणारे उपयोग याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण
केडीएमसीसाठी कुशीवली धरण आरक्षित करा : आमदार भोईर