December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Evergreen सासूची दमदार Entry..!

“वासूची सासू” पुन्हा रंगमंचावर..!

अमेय रानडे

‘अभिजात’ निर्मित, ‘व्यास क्रिएशन्स’ प्रकाशित आणि ‘प्रदीप दळवी’ लिखित दर्जेदार कॉमेडी नाटक “वासूची सासू” पुन्हा रसिक प्रेक्षकांना हसवायला येत आहे.

अभिनेते बबन प्रभू, राजा गोसावी, दिलीप प्रभावळकर, अविनाश खर्शीकर, अरुण नलावडे, अतुल परचुरे, अश्विनी भावे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी एके काळी अजरामर केलेलं हे नाटक रंगमंचावर पाहण्यात खरी मजा आहे. म्हणूनच या नाटकाचे पुनरुज्जीवन करून एक धमाल फार्स पुन्हा एकदा रंगमंचावर आणण्याचं धाडस ‘अभिजात’चे निर्माते आकाश भडसावळे यांनी करायचे ठरवले. ‘अभिजात’च्या जोडीने ‘व्यास क्रिएशन्स’ या मुख्यतः प्रकाशन व्यवसाय असणाऱ्या संस्थेनेही या नाट्य निर्मितीत सहयोग दर्शवला आहे. अभिजातची ही चौथी कलाकृती असून व्यासने मात्र प्रथमच व्यसपीठाकडून रंगमंचावर पदार्पण केले आहे.

या नाटकात वासू नामक पेईंग गेस्ट अण्णा नावाच्या घरमालकाकडे राहात असतो. घरमालकाची बायको खूप शिस्तप्रिय असते. वासूची प्रेयसी शीतल घरी येणार असल्याने या शिस्तप्रिय मालकिणीला बाहेर पाठवण्याचा डाव रचला जातो आणि ऑफिसला सुट्टी काढायची म्हणून ‘सासू मेल्याचं’ कारण वासू देतो; तेव्हा मेलेल्या सासूला बघायला ऑफिसची सगळी मंडळी येणार असं कळल्यावर सगळ्यांची जी काही तारांबळ उडते ती सगळी या नाटकात दाखवली आहे.

“वासूची सासू” हे फार्सिकल नाटक आहे. प्रासंगिक विनोदाने भरलेली ही एक मेजवानी आहे. आता पुन्हा एकदा वासूची सासू रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचे दिग्दर्शन दुर्गेश मोहन यांनी केले असून नेपथ्य संदेश बेंद्रे, संगीत संकेत पाटील, प्रकाशयोजना मयुरेश मोडक आणि रंगभूषेची महत्वाची बाजू उलेश खंदारे सांभाळत आहेत. अनेक भूमिकांतून आपला ठसा उमटवणारा अभिनेता अभिजीत केळकर, ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवे, अभिनेता आकाश भडसावळे, तपस्या नेवे, स्वप्ना साने, अथर्व गोखले, सुयश पुरोहित, वल्लभ शिंदे, संजना पाटील हे कलाकार या नाटकात काम करणार आहेत.

एक अभिजात नाटक पुन्हा एकदा करीत असल्याचा आनंद आणि समाधान असल्याचे अभिजातचे निर्माते म्हणाले. तसंच या नाटकाच्या निमित्ताने व्यास क्रिएशन्सच्या नाट्य क्षेत्रातील नव्या पावलाचे प्रेक्षक भरभरून स्वागत करतील अशी आशा व्यासच्या वैशाली गायकवाड आणि व्यास ग्रुप ऑफ कंपनीजचे निलेश गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

प्रदीप दळवी लिखित, दुर्गेश मोहन दिग्दर्शित आणि अभिजात निर्मित “वासूची सासू” या दोन अंकी नाटकाचा शुभारंभ शुक्रवार ४ फेब्रु. दु. ४:३० वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे.