दहा नगांची किंमत पंधरा लाख
ठाणे
दुर्मिळ प्रजातीचे संरक्षित वन्यजीव सांबर आणि चितळ यांची शिंगे विक्रीसाठी आलेल्या शुभम देविदास शिंदे (रा. टिटवाळा) या २६ वर्षीय तरुणाला ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखा युनीट ५ ने जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे १५ लाख रूपये किंमतीची ८ किलो ग्रॅम वजनाची सांबर आणि चितळ यांची १० नग शिंगे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्यातील विवियाना मॉलजवळ एक जण दुर्मिळ प्रजातीचे संरक्षित वन्यजीव सांबर आणि चितळ यांची शिंगे विक्रीकरीता येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखा युनीट ५ चे सहायक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांचे मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांचेसह युनिटने सापळा रचुन शुभम याला मंगळवारी ताब्यात घेतले.

याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४४, ४८, ४८ (अ), ५१ अन्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. तसेच मुद्देमाल हस्तगत केला असून त्याने सांबर आणि चितळ यांची कोठे शिकार करून शिंगे मिळविली. तसेच ती कोणास विक्री करणार होता, याचा पुढील तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस निरीक्षक अरूण क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरिक्षक भुषण शिंदे, पोलीस उपनिरिक्षक शिवाजी कानडे, सहायक फौजदार सालदुर, सुनिल अहिरे, पोलीस हवालदार संदिप शिंदे, रोहिदास रावते, पोलीस नाईक रघुनाथ गार्डे, सुनिल निकम, राहुल पवार, तेजस ठाणेकर, उत्तम शेळके, पोलीस कॉन्स्टेबल यश यादव या पथकाने केली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू