कल्याण
गत दोन वर्षांपासून कोरोना काळामध्ये शाळा बंद होत्या. मुले ऑनलाइन अभ्यासामध्ये व्यस्त असतानाच आता शाळेची घंटी वाजली असून सर्व शाळांमध्ये किलबिलाट सुरू आहे. त्या मध्येच प्रदीर्घ काळानंतर म्हणजेच दोन ते अडीच वर्षानंतर शाळांमध्ये क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली.
कल्याण पूर्वच्या सम्राट अशोक विद्यालयात शाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच क्रीडा महोत्सव घेऊन कल्याण तालुक्यात बाजी मारली आहे. शाळेने कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करत तीन दिवस क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले. महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण समितीचे सदस्य व क्रीडा प्रशिक्षक अविनाश ओंबासे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. क्रीडा ध्वज फडकवून क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली.
खेळाडूंना मार्गदर्शन करताना ओंबसे म्हणाले की, विद्यार्थी, खेळाडू आता कुठेतरी मैदानावर दिसू लागलेत. खेळ हा विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व घडवणारा आहे. गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थी घरात असल्याने शारीरिक विकास खुंटला. कोरोना नियमांचं पालन करून सम्राट अशोक विद्यालयाने क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या हे महत्त्वपूर्ण आहे. आपला भारत देश लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. परंतु ऑलिम्पिकमध्ये ४८ वा क्रमांक लागतो. खेळाडू खऱ्या अर्थाने शालेय जीवनापासून तयार करायला पाहिजेत तसं शासनाचे धोरण असायला हवे. शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व देणे अपेक्षित आहे. बालवयात खेळाडू तयार केलेत तर ऑलिम्पिकमध्ये आपणही अव्वलस्थानी येऊ शकतो.
या क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडे येण्याचा ओढा वाढेल आणि आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा जो पालकांचा विचार आहे त्यामध्ये बदल होईल अशी अपेक्षा यावेळी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय, माध्यमिक मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडेंसह शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश पाटील यांनी केले तर आभार ओमप्रकाश धनविजय यांनी मानले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर