जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरण
ठाणे
जिल्ह्यातून गुणवंत खेळाडू निर्माण होऊन ठाणे जिल्ह्याचं नाव ऑलिम्पिकमध्ये झळकण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (महिला व पुरुष) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे योगदान व मूल्यमापन होऊन त्यांच्या गौरव सोहळा व्हावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारांचे वितरण आज जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ठाणे जिल्ह्यातील ॲथलेटिकपटू श्रीनिवास गुप्ता यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार तर पॉवरलिफ्टिंग खेळाडू शरद यादव व जिम्नॅस्टिकपटू नेहा दांडेकर यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आला. रोख रक्कम रुपये १० हजार, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे पुरस्कारचे स्वरूप आहे.
यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी पुरस्कारप्राप्त खेळाडू आणि मार्गदर्शक यांचे अभिनंदन करीत क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सुरूवातीपासूनच ठाणे जिल्हा खेळासाठी प्रसिद्ध असल्याचे सांगत अधिकाधिक खेळाडू येथे तयार व्हावेत यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी तालुका क्रिडा संकुलाची निर्मिती होत असून त्याचा फायदा खेळाडू आणि प्रशिक्षकांना होणार आहे. त्यातून ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंचे नाव झळकावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पॉवरलिफ्टिंग खेळाडू शरद श्रीरंग यादव याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून ठाणे जिल्ह्याचे नावलौकिक मिळविल्याबद्दल तर जिम्नॅस्टिक खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून ठाणे जिल्ह्याचे नावलौकिक केल्याबद्दल नेहा समीर दांडेकर अशा या दोघांचा गुणवंत खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला. गेल्या दहा वर्षात ठाणे जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय पदक प्राप्त ॲथलेटिक्स खेळाडू घडवून आणल्याबद्दल मार्गदर्शक श्रीनिवास छोटेलाल गुप्ता यांना गुणवंत मार्गदर्शक पुरस्काने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास तालुका क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव, क्रिडा अधिकारी सुचिता ढमाले, क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने, जुबेर शेख, महेंद्र बाभुळकर आदी उपस्थित होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर