December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

ठामपाच्या परिवहन सेवेकडून जादा बस फेऱ्यांचे नियोजन

* ५ ते ७ फेब्रुवारीला रेल्वेचा ७२ तासांचा मेगाब्लॉक, * प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेण्याचे परिवहन सेवेचे आवाहन

ठाणे

ठाणे स्थानक ते दिवा स्थानक दरम्यान शनिवार ०५ फेब्रुवारी ते सोमवार ०७ फेब्रुवारी दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून विशेष ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे) ते दिवा या मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेने करण्यात आले आहे.

रेल्वे विभागाकडून शनिवार ०५ फेब्रुवारीला रात्री ०१.३० वाजल्यापासुन ते सोमवार ०७ फेब्रुवारी रोजी रात्री ०१.३० वाजेपर्यत ७२ तासांचा महामेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होवू नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून विशेष जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन या मार्गावर सरासरी १० मिनिटांच्या प्रस्थानांतराने आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे ) ते दिवा स्टेशन या मार्गावर १५ मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात २०५ बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व संचलनावर देखरेख करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक, चेंदणी कोळीवाडा व मुंब्रा रेल्वे स्थानक येथे पर्यवेक्षकिय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कामासाठी संपर्क अधिकारी म्हणुन सचिन दिवाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तरी प्रवाशांनी मेगाब्लॉक कालावधीत बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.