December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

श्री गणेश जयंती : कल्याणचा श्री अक्षत गणपती 

कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ याठिकाणी अक्षत गणपती मंदिर आहे. पुण्यातील कसबा गणपतीला जसे मानाचे स्थान आहे तोच मान कल्याण शहराचा गणपती म्हणून या मंदिराला आहे. या गणपतीला कल्याणमधील गणेशभक्त प्रथम शुभकार्याची अक्षता देऊन श्रींचे आशीर्वाद घेत असल्याने यास अक्षत गणपती मंदिर हे नावं पडले.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

श्री अक्षत गणपती मंदिर पेशवेकालीन असून सरदार लेले यांनी बांधले आहे. मंदिर साधारण २०० वर्षांपूर्वी बांधलेले असावे असे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून वाटते.

| श्री अक्षत गणपती मंदिराचा गाभारा

श्रींचे वास्तव्य आणि स्वरूप

कल्याणातील गांधी चौकातील प्रसिद्ध सुभेदार वाड्याचे जवळ बाजारपेठेतील रस्त्याच्या पश्चिमेस अदमासे दोनशे फुटांवर आतल्या बाजूस हे मंदिर वसलेले आहे. या गणपती मंदिराला ५० फुट लांब आणि २० फुट रुंद असे प्रशस्त सभा मंडप आहे. त्यात श्री गणेशाची मूर्ती ज्या ठिकाणी आहे तो १० फुट लांब आणि १२ फुट रुंदीचा गाभारा आहे. गाभाऱ्यात सहा फुट लांब आणि साडे चार फुट रुंद तसेच तीन फुट उंचीचा चौथरा आहे. चौथऱ्याच्या मध्यभागी श्री गणेशाची सिंदूर विलेपित अडीच फुट उंच, डाव्या सोंडेची चतुर्भुज अशी डाव्या भूजेतील श्रीफळाला शुंडास्पर्श केलेली, मागील भुजा खांद्यावर टेकविलेल्या स्थितीत डाव्या पायांची मांडी घातलेली आणि उजवा पाय उभा ठेवून त्यावर उजवी भुजा आशीर्वादाच्या पवित्र्यात असलेली शूर्पकर्णाची पश्चिमाभिमुख मोहक नेत्राची मूर्ती विराजमान आहे. अक्षत गणपतीची मूर्ती हि काळ्या पाषाणातील असून डाव्या बाजूला गणपतीची छोटी मूर्ती आहे. तर उजव्या बाजूला मारुती असून शिवलिंग आहे. गाभाऱ्यात नंदादीप अखंड तेवत आहे. मूर्ती उजव्या हाताने आशीर्वाद देवून तसेच दुसऱ्या हातात परशु आहे. तर डाव्या हातात मोदक असून परशु आहे. गणपतीचे वाहन उंदीर आहे. संपूर्ण मूर्तीला शेंदरी रंग असून डोळे, सोंड सुबक आहे. कंबरेला मेखला आहे. पायात तोडे, हातात कंगण आहे. गाभाऱ्याला लोखंडी दरवाजा असून प्रदक्षिणा मार्ग आहे. सभा मंडपात लाकडी नऊ खांब असून त्यावर माळा आहे. सुरुवातीच्या खांबावर सुबक नक्षीकाम आहे.