डोंबिवली
डोंबिवलीतील बनावट धनादेश प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह आठ जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. बनावट धनादेश तयार करुन आतापर्यंत देशभरात १० कोटीचा गंडा घालणाऱ्या या टोळीचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला.
ऑक्टोबर २०२१ रोजी पूर्वेतील एचडीएफसी बँकेच्या शाखेत तीन जण एक बनावट धनादेश घेऊन गेले होते. तिघांपैकी हरिश्चंद्र कडवे याने आपण वांगणीतील संत रोहिदास सेवा संस्थेचा अध्यक्ष असल्याची बतवणी करत आपल्या संस्थेला इंडोस टॉवर लिमिटेड या मोबाईल टॉवर कंपनीकडून २४ कोटी रुपये देणगी मिळाल्याचे सांगितले. बँकेतील क्लार्कने या धनादेशाबाबतची माहिती मॅनेजरला दिली. या तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने मॅनेजरने मानपाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच बँकेत आलेल्या पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी, ही फसवणुकीची घटना समोर आली.
अटक केलेल्या आठ जणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन साळसकर हा कॉम्प्युटर मॅकेनिक आहे. भावेशकुमारच्या सांगण्यावरुन साळसकर कोणत्याही बँकेचा बनावट धनादेश तयार करीत होता. असाच २४ कोटीचा धनादेश त्याने इंडोस टॉवर कंपनीच्या चेक व्यवहार बघणाऱ्या व्यक्तीच्या स्वाक्षरीचा बनवला होता. टोळीचा सूत्रधार भावेशकुमारला मानपाडा पोलिसांनी गुजरातहून बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
भावेश हा याआधीही अशाच एका प्रकरणात कारागृहात होता. या टोळीने तामिळनाडू, गुजरात कर्नाटक महाराष्ट्र यासह अन्य राज्यातही अशी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे. मानपाडा पोलीस सखोल तपास करीत आहेत.
जयराम मोरे, सहायक पोलीस आयुक्त (डोंबिवली)
या टोळीकडून आतापर्यंत गुजरात राज्यातील ३, तामिळनाडू व कर्नाटक राज्यातील १ गुन्हा असे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून धनादेश बनविण्यासाठी वापरण्यात येणारे लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल फोन व बनावट धनादेश असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, सपोनिरी श्रीकृष्ण गोरे, पोहवा काटकर, पोना मासाळ, पोशि ढाकणे यांच्या पथकाने केली आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर