December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

सुखकर रेल्वे प्रवासासाठी आशेचा किरण…?

पाचव्या-सहाव्या मार्गिकांचे काम आता बरेचसे मार्गी लागल्याने निश्चितच दिलासा मिळणार आहे. पण सुखकर, आरामदायी प्रवासासाठी मुंबई-कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, कल्याण-आसनगाव चौथा मार्ग, कल्याण-बदलापूर तिसरा-चौथा मार्ग, कल्याण स्थानकाचे रिमॉडेलिंग या प्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. पण हे प्रकल्प वेळीच पूर्ण होणे गरजेचे आहे.

विद्याविहार ते कल्याण पाचवी सहावी मार्गिका पूर्ण, पुढे काय?

डोंबिवली

कोविडचे कमी होऊ लागलेले रुग्ण आणि वाढते लसीकरण. यामुळे मुंबईतील जीवनवाहिनी असलेल्या लोकलला पूर्वीप्रमाणे गर्दी होऊ लागली आहे. दरवाज्यात लटकत, लोंबकळत प्रवास करणे, खच्चून भरलेल्या गाडीत मुंगीलाही शिरायला जागा नसतानाही ‘ए चलो अंदर,’ अशी आरोळी ठोकत मुंबईकर प्रवास करत आहेत. पण पाचव्या-सहाव्या मार्गिकांचे काम आता बरेचसे मार्गी लागल्याने निश्चितच दिलासा मिळणार आहे. पण सुखकर, आरामदायी प्रवासासाठी मुंबई-कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, कल्याण-आसनगाव चौथा मार्ग, कल्याण-बदलापूर तिसरा-चौथा मार्ग, कल्याण स्थानकाचे रिमॉडेलिंग या प्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. पण हे प्रकल्प वेळीच पूर्ण होणे गरजेचे आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरी क्षेत्रातील वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी पाचव्या-सहाव्या मार्गिकांचा पर्याय पुढे आला. २००८ मध्ये त्याला मंजुरी मिळाली. पण तो सत्यात उरवण्यासाठी भागिरथ प्रयत्न करण्याचे एक मोठे आव्हान रेल्वे प्रशासना पुढे आहे. मुळात म्हणजे, दोन नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी जागेची उपलब्धता हा यक्षप्रश्न आहे. विद्याविहार ते ठाणे आणि पुढे दिवा ते कल्याणदरम्यान दोन मार्ग काही वर्षांपूर्वी पूर्ण झाले. आता मंगळवार, ८ फेब्रुवारी २०२२ पासून ठाणे ते दिवादरम्यान रखडलेला मार्गही पूर्ण होत आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स ते कुर्ला दरम्यान हे दोन मार्ग कधी पूर्ण होणार? याचे उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे खोपोली-कर्जत तसेच कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स दरम्यान सुखकर प्रवासासाठी आणखी प्रतीक्षा करण्याशिवाय प्रवाशांच्या हाती काहीच नाही.

मुंबईतील दळवळण सुधारण्यासाठी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट २ (एमयुटीपी २) अंतर्गत मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स ते कुर्ला पाचव्या व सहाव्या मार्गिकांसाठी ६५९ कोटी तर, ठाणे- दिवादरम्यान अतिरिक्त मार्गासाठी १३३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, वरील दोन्ही टप्पे रखडल्याने या प्रकल्पांचा खर्च अनुक्रमे ९२३.७८ कोटी आणि २८७.६२ कोटींवर गेला आहे. या दोन्हींपैकी ठाणे ते दिवादरम्यानचे अतिरिक्त दोन मार्ग मंगळवारपासून खुले होत आहेत. उपनगरी लोकलच्या जलद आणि धीमीसाठी दोन स्वतंत्र मार्ग, तर मेल-एक्स्प्रेस आणि मालगाडय़ांच्या वाहतुकीला स्वतंत्र मार्ग उपलब्ध  होणार असल्याने विद्याविहार ते कल्याणदरम्यानच्या प्रवासाला काहीशी गती मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. परंतु, हा प्रवास आणखी वेगवान होण्याच्या दृष्टीने कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जतदरम्यान तिसरी मार्गिका तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स ते कुर्ला पाचव्या व सहाव्या मार्गिका पूर्ण होणे ही काळाची गरज आहे.

खाडी मार्ग, बोगद्याची भर

ठाणे ते दिवादरम्यानचा साधारणत: ९.९ किलोमीटरचा टप्पा पूर्ण १२ वर्षे रखडला होता. त्यात ठाणे खाडी, मुंब्रा खाडीवर मार्ग बांधणे तसेच मुंब्रा-कळव्यादरम्यानचा बोगदा आणि पूल हे खडतर काम होते. मुंब्रा खाडी परिसरातील खारफुटी तोडून मार्ग बांधताना पर्यावरणाचा प्रश्नही तितकाच गंभीर मुद्दा होता. यावर मात केल्यानंतर जुन्या मार्गिकांचे स्थलांतर करणे, नवीन ओव्हरेड वायर टाकणे, नवीन मार्गानुसार सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मागील काही महिन्यांपासून सातत्याने मेगाब्लॉक घेतले आहेत.

नवीन फलाट आणि दिवा लोकल…

अतिरिक्त दोन मार्गामुळे मुंब्रा, कळवा या दोन स्थानकांसाठी दोन अतिरिक्त फलाट उपलब्ध झाले आहेत. भविष्याच्या दृष्टीने तेथील प्रवाशांसाठी ही एक जमेची बाजू म्हणता येईल. दिव्यात मागील काही वर्षापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर तेथे काही प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या होत्या. या सोयी सुविधांमुळे भविष्यात दिव्याहून स्वतंत्र लोकल सोडणे शक्य होईल. त्याचा फायदा दिव्याबरोबरच कळवा, मुंब्रावासीयांना होऊ शकतो. तसे झाल्यास सध्या गर्दीच्या वेळेस कळवा कारशेडमधून येणारी-जाणारी ठाणे लोकल रूळांत उभे राहून पकडणे अथवा उतरण्याची कसरत कळव्यातील प्रवाशांना करावी लागणार नाही. शिवाय सकाळी रूळांतून कळवा-ठाणे पायपीट करण्याची आपबत्ती त्यांच्यावर ओढावणार नाही. त्यामुळे रेल्वे अपघांतही काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

मुंब्रा, कळव्यात जलद लोकलचा थांबा ?

दिव्यात झालेल्या आंदोलनानंतर दिव्यातील फलाटांचा विकास झाला. त्यामुळे तेथे आलटूनपालटून का होईना काही जलद लोकल दिव्यात थांबू लागल्या. आता जलद लोकल पारसिकऐवजी कळवा-मुंब्रा मार्गे जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात मुंब्रा व कळव्यातही जलद लोकलना थांबा देणे शक्य होऊ शकते.

प्रवासाचे अंतर व वेळ वाढला़?

नवीन धीमा मार्ग मुंब्रा-कळवादरम्यान खाडीजवळून गेला आहे. त्यामुळे थकलेल्या प्रवाशांना खाडीचे विहंगम दृश्य दिसत असून, गार वारे त्यांचा थकवा दूर करत आहेत. तर दुसरीकडे लोकलचा जलद मार्ग आता पारसिक बोगद्याऐवजी कळवा-मुंब्रा धीम्या मार्गाशेजारून गेला आहे. पारसिक बोगद्या हा एक मोठा शॉर्टकट बंद होणार आहे. या दोन्ही बदलांमुळे प्रवासाचे अंतर व वेळ वाढल्याचे निरीक्षण प्रवाशांनी नोंदवले आहे.

१०० फेऱ्या वाढणार?

पाचवा-सहावा मार्ग सुरू झाल्यानंतर लोकलच्या ८० ते १०० फेऱ्या वाढतील, असे सांगितले जात आहे. परंतु, या फेऱ्यांसाठी वाढीव रेकची गरज भासणार आहे. मात्र, ते उपलब्ध होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, त्यात एसी गाड्यांचाही समावेश करण्याचा प्रयत्न आहे. परंतु, प्रवाशांना एसी लोकलऐवजी वेळेवर आणि दर्जेदार लोकल सेवेची आवश्यकता आहे. त्याचबरोबर कल्याण ते पनवेल, वाशी दरम्यान गाड्या सोडल्यास नवी मुंबईत जाणारे नोकरदार, एपीएमसीतील व्यापारी व कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.

ठाकुर्ली टर्मिन्स, कल्याणचे रिमॉडेलिंग व अन्य प्रकल्प

पाचवा-सहावा मार्ग पूर्ण होत असताना कल्याणचे रिमॉडेलिंग करण्याचे शिवधनुष्य रेल्वेला पेलावे लागणार आहे. सरासरी ८०० कोटींच्या प्रकल्पाला २०१८ मध्ये मान्यता मिळाली. परंतु, आता केवळ ६० कोटींचा निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे लोकल व मेल गाड्यांसाठी वेगळे फलाट असतील. त्यामुळे लोकल व मेल गाड्यांचा खोळंबा होणार नाही. त्याचबरोबर ठाकुर्ली टर्मिन्ससाठी जागा उपलब्ध असतानाही तो मार्गी लावण्याची गरज आहे. किमान ठाकुर्ली यार्डला डोंबिवली बाजूस प्रवेशद्वारे केल्यास ठाकुर्ली व डोंबिवलीतील प्रवाशांना लोकल उपलब्ध होऊ शकेल.

मेगा ब्लॉकचे प्रमाण घटणार

एकूण सहा मार्ग उपलब्ध होणार असल्याने मेगाब्लॉक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा ताण येणार नाही.

रेल्वे फाटकांवर उड्डाणपूल

दोन-तीन वर्षांपूर्वी ठाकुर्लीजवळ रेल्वे उड्डाणपूल झाल्याने तेथील रेल्वे फाटक बंद झाली. जानेवारीत कळवा येथील फाटक इतिहासजमा झाले. तारीख पे तारीख पडत असलेल्या तेथील उड्डाणपूल अखेर खुला झाला. टिटवाळा येथील पूलही मार्गी लागतोय. अशा प्रकारे अन्य ठिकाणांचे फाटक बंद होणार असल्याने आता फाटक उघडे राहिल्यामुळे वेळापत्रक विस्कळीत होण्याचे प्रमाण जवळपास शून्यावर येणार आहे. त्यामुळे रेल्वे वेळेवर धावण्यास मदतच होणार आहे.