April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्राचा ५५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी

प्रथमत:च महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे होणार थेट प्रक्षेपण

कल्याण

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात महाराष्ट्राचा ५५ वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक ११, १२ व १३ फेब्रुवारी, २०२२ रोजी व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात आला आहे. या संत समागमाचा भरपूर आनंद जगभरातील समस्त भाविक भक्तगण आपापल्या घरातूनच ऑनलाईनच्या माध्यमातून घेऊ शकतील.

दरवर्षी नववर्षाचे आगमन होताच संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील समस्त भाविक-भक्तगणांना भक्ती, प्रेम व आनंद यांच्या अद्भुत संगमाची अलौकिक अनुभूती प्रदान करणाऱ्या या संत समागमाची प्रतिक्षा असते. ज्यामध्ये विविध संस्कृती, सभ्यतांचे अनोखे मिलन पहायला मिळते. हा संत समागम आपल्या विविधरंगी छटांमधून अनेकतेत एकतेचे चित्र प्रस्तुत करत विश्वबंधुत्वाची संकल्पना साकार करताना दिसतो.

मागील वर्षी महाराष्ट्र समागमाचे चित्रण अगोदर करण्यात आले होते व त्यानंतर ते व्हर्च्युअल रुपात प्रसारित करण्यात आले. मात्र, यावर्षी या समागमाचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) मिशनच्या वेबसाईटवर सायंकाळी ५.०० ते रात्री ९.३० आणि साधना टी.व्ही. चॅनलवर सायंकाळी ६.०० ते रात्री ९.३० या वेळात करण्यात येणार आहे. इतिहासामध्ये प्रथमत:च महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

| वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी

समागमाचे थेट प्रक्षेपण होणार असल्याच्या बातमीने समस्त निरंकारी जगतामध्ये हर्षोल्लासाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय समागमाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी १२.०० ते २.०० या वेळात होणाऱ्या सेवादल रॅलीचेही थेट प्रक्षेपण मिशनची वेबसाईट आणि साधना टी.व्ही.चॅनलवर प्रसारित केले जाणार आहे. यावर्षीचा संत समागम ‘विश्वास, भक्ती, आनंद’ या विषयावर आधारित आहे.

वैश्विक महामारी कोविड-१९ चा प्रभाव अद्याप पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. ही बाब ध्यानात घेऊन संत समागमाची पूर्वतयारी पूर्ण समर्पण भावनेने व जागरुकपणे सरकारकडून जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत केली जात आहे. समागमाच्या आयोजनात भाग घेणाऱ्या सेवादारांकडून थर्मल स्क्रीनिंग, मास्क, सॅनिटायझेशन व सामाजिक अंतर याबाबतच्या नियमांचे यथायोग्य पालन केले जात आहे. याशिवाय समागमाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांची कोविड (RT-PCR, Rapid Antigen Test) चाचणीदेखील केली जात आहे. त्यांच्यासाठी कोविड-१९ च्या दोन लसी घेतलेल्या असणे अनिवार्य करण्यात आले आहे.