डोंबिवलीतील विजया बाविस्कर यांना एकट्याने राहणे पडले महागात
सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवली शहराची १७ जानेवारीची सकाळ मात्र संपूर्ण शहराला अस्वस्थ करणारी ठरली. पूर्वेतील टिळक चौकात एकट्या राहणाऱ्या ५८ वर्षीय महिलेची घरातच हत्या झाल्याचे उघडकीस आले. शांत आणि इतरांना मदत करण्याचा स्वभाव असलेल्या या महिलेची हत्या कोणी आणि का केली? याबाबत शहरात चर्चा सुरू झाली.

डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस १७ जानेवारीला नेहमीप्रमाणे आपले काम करत होते. सकाळचे साधारण ९ वाजले असल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या दिवसभराच्या कामाचा आढावा घेण्यात गुंतले होते.
तर त्याच दरम्यान, त्यांच्याच हद्दीतील टिळक चौकातील आनंद शीला इमारतीमध्ये राहणाऱ्या विजया बाविस्कर (५८) यांच्या घरी काम करणारी बाई नेहमीप्रमाणे सकाळी घरी आली. घराला बाहेरून कडी लावली असल्याने बाविस्कर कुठे तरी बाहेर गेल्या असतील असे समजून तिने कडी उघडून घरात प्रवेश केला. घरात येताच तिला जे काही दिसले ते काळजात धस्स करणारे होते. बाविस्कर या हॉलमध्ये मृतावस्थेत पडलेल्या होत्या. घाबरलेली बाई तशीच बाहेर आली, घडला प्रकार तिने शेजाऱ्यांना सांगितला आणि लगेचच पोलिसांनाही कल्पना दिली.
बाविस्कर यांची कोणीतरी हत्या केल्याचे टिळकनगर पोलिसांना समजले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांना सांगितली. घरात एकट्या राहणाऱ्या महिलेची अशी हत्या झाल्याचे कळताच त्यांनी पोलिसांना तातडीने घटनास्थळी पाठविले. बाविस्कर यांचा गळा आवळून खून झाला होता, हे घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या लक्षात आले.

बाविस्कर या घटस्फोटित होत्या. ३० वर्षांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता, आणि त्या वडिलांकडे राहत होत्या. सहजासहजी कुणावर संशय घ्यावा, अशी काही स्थिती नव्हती. बाविस्कर यांची प्रॉपर्टीही चांगली असल्याने प्रॉपर्टीचा काही वाद आहे, अशी शंका पोलिसांना आली होती. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना बाविस्कर यांच्या घरात कोणीही जबरदस्तीने घुसल्याचे जाणवले नाही. त्यावरून त्यांची हत्या ओळखीच्या व्यक्तीनेच केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला. घराची तपासणी केली असता घरातील कोणत्याही वस्तूला हात लावल्याचे दिसले नाही.
बाविस्कर यांच्या हत्येची माहिती डोंबिवलीत राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला कळताच तिनेही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी आलेल्या बहिणीने बाविस्कर यांच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील सोनसाखळी, बांगड्या आणि घड्याळ चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले. बाविस्कर यांच्या बहिणीच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिसांची पाच पथके तयार
तर, दुसरीकडे या घटनेची माहिती आफळे यांनी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहायक पोलीस आयुक्त (डोंबिवली) जयराम मोरे यांना दिली. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने बाविस्कर यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांनी केलेल्या सूचनेनुसार पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली. तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे अहोरात्र तपास सुरू झाला. टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात रात्रीच्यावेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. परंतु, म्हणावे तसे यश पोलिसांना मिळत नव्हते. याच दरम्यान रात्री ११.३० च्या सुमारास सीसीटिव्हीच्या रूपाने एक आशेचा किरण पोलिसांच्या हाती लागला आणि या हत्येचा २४ तासांत पोलिसांनी उलघडा केला.

सीसीटिव्हीतील काही सेंकदाच्या दृश्यामुळे उलघडा
रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास एक महिला हातामध्ये एक पिशवी घेऊन बाविस्कर रहात असलेल्या आनंद शीला इमारतीमध्ये जाताना आणि मध्यरात्री २.४० च्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत या इमारतीच्या मागील बाजूच्या रस्त्याने बाहेर पडतानाचे काही सेकंदाचे दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाले. या महिलेने आपला चेहरा स्कार्फने पूर्णपणे झाकला असल्याने तिची ओळख पटणे अवघड झाले होते. अशाही परिस्थितीत पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. अशा वर्णनाची एक महिला याच परिसरात पोळीभाजी केंद्र चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खात्री करण्यासाठी या महिलेच्या घरी पोलीस धडकले. पोलिसांना घरापर्यंत आल्याचे पाहताच घाबरलेल्या या महिलेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या घरात एका पिशवीत कोंबून ठेवलेली घटनेच्या दिवशी घातलेली साडी आणि स्कार्फ तसेच बाविस्कर यांच्या अंगावरील चोरलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. चौकशीसाठी त्या महिलेला टिळकनगर पोलीस ठाण्यात आणले असता तिने गुन्ह्याची कबुली देत सर्व घटनाक्रम पोलिसांसमोर कथन केला.

कर्जाच्या डोंगरातून बाहेर पडण्यासाठी निवडला मार्ग
डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली परिसरात राहणाऱ्या सीमा खोपडे (४०) हिचे बाविस्कर पूर्वी राहत असलेल्या इमारतीजवळच पोळीभाजी केंद्र होते. एकट्या राहणाऱ्या बाविस्कर अधूनमधून या केंद्रावर पोळीभाजी घेण्यासाठी जात होत्या. त्यामुळे, सीमा आणि बाविस्कर यांची तोंडओळख झाली होती. याच तोंडओळखी दरम्यान सीमाने बोलण्यातून बाविस्कर यांच्याकडून त्यांच्याबद्दलची सर्व माहिती काढायला सुरुवात केली. बाविस्कर यांच्या बोलण्यातून त्या घटस्फोटीत असल्याचे तसेच त्या एकट्या राहत असल्याचे सीमाला समजले. याच दरम्यान, पूर्वेतील गोपाळनगर येथील वडिलोपार्जित इमारत विकसित करण्यासाठी दिल्याने बाविस्कर या आनंद शीला इमारतीत राहण्यासाठी आल्या. या इमारतीच्या जवळच सीमाचा गणपतीचा कारखाना होता. जो तिचा पती सांभाळायचे. पती कामानिमित्त बाहेर गेल्यावर सीमा तेथे जात असे. त्यामुळे, बाविस्कर आणि सीमा यांच्यात थोड्याफार प्रमाणात बोलणे होत होते. घटनेच्या काही दिवस अगोदर बाविस्कर या जेव्हा सीमाकडे पोळीभाजी घेण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या अंगावर असलेले दागिने पाहून सीमाची नियत फिरली. आपल्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरातून बाहेर पडायचे असल्यास या दागिन्यांवर डल्ला मारण्याचा विचार सीमाच्या डोक्यात दिवसरात्र घोळू लागला.

काय घडलं ‘त्या’ रात्री…
घटनेच्या आदल्यादिवशी, १६ जानेवारीला बाविस्कर आणि सीमा यांची भेट झाली. यावेळी बोलता बोलता माझा पती आणि मुले गावी गेल्याने मी घरात एकटीच असल्याचे तिने बाविस्कर यांना सांगितले. घरात एकटीच असल्याने मी तुमच्याकडे झोपायला आले तर चालेल का, अशी विचारणा सीमाने केली. शांत स्वभाव आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या बाविस्कर यांच्या मनात सीमाच्या मनातील कावा ओळखता आला नाही. आणि, त्यांनी आपला होकार दिला. त्याच रात्री बाविस्कर आणि त्यांची एक मैत्रीण रात्री १०.३० वाजेपर्यंत घरात गप्पा मारत बसल्या होत्या. या गप्पा शेवटच्या असतील अशी जराशी सुद्धा कुणकुण या दोघींना नव्हती. गप्पा संपल्यानंतर मैत्रीण घरी निघून गेली. आणि, रात्री ११.३० च्या सुमारास आपल्यासोबत जेवणाचा डबा घेऊन बाविस्कर यांच्या घरी सीमा पोहोचली. दरवाजात सीमाला पाहून बाविस्कर यांनी दरवाजा उघडून तिला घरात घेतले. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यानंतर दोघी झोपल्या. बाविस्कर या झोपल्या. मात्र चोरीच्या उद्देशाने आलेल्या सीमाला झोप लागत नव्हती. बाविस्कर कधी गाढ झोपतील आणि कधी एकदा दागिने घेऊन पोबारा करू याचाच विचार सीमा करत होती. थोड्या वेळात बाविस्कर झोपल्याची जाणीव होताच सीमाने त्यांच्या अंगावरील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, बाविस्कर यांना जाग आल्याने आपले बिंग फुटेल या भीतीने सीमाने ताकदीनिशी बाविस्कर यांचा गळा आवळला. काही वेळाने निपचित पडलेल्या बाविस्कर यांच्या अंगावरील दागिने चोरून सीमा घराबाहेर पडली. जाताना तिने दरवाजाला बाहेरून कडी लावली. आणि, ज्या रस्त्याने ती आली त्या रस्त्याने परत न जाता इमारतीच्या मागील बाजूच्या रस्त्याने बाहेर पडली. घरी आल्यावर साडी, स्कार्फ आणि चोरीचे दागिने एका पिशवीत ठेवून घरात ठेवले. आणि निर्धास्त झाली. सकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू केले. बाविस्कर यांच्या मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत असल्याचेही तिला कळले. मात्र, आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू शकत नाही, याच आविर्भावात राहिली. पण, एका सीसीटिव्हीमुळे तिचे हे कृत्य समोर आले अन् ती गजाआड झाली.

अवघ्या २४ तासांत या अधिकाऱ्यांनी लावला तपास
गुन्हा उघडकीस आणण्याच्या कारवाईत अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त (डोंबिवली) जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक वैभव चुंबळे, प्रवीण बाकले, पोलीस उपनिरिक्षक अजिंक्य धोंडे, पोलीस उपनिरीक्षक ममता मुंजाळ, सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश वणवे, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे (मानपाडा पोलीस), पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे (रामनगर पोलीस), कुलदीप मोरे (विष्णूनगर पोलीस) आणि पोलीस अंमलदार ए. एस. आय. साबळे, हवालदार गोविंद तळगांवकर, पोलीस नाईक रामेश्वर राठोड, तानाजी राठोड, मोहन जाधव, कृष्णा दुमडा, गोरखनाथ घुगे, दीपक गडगे, विनोद बच्छाव, श्याम सोनवणे, कॉन्स्टेबल संजय फड, खाडे, थोरात, महिला कॉन्स्टेबल दिपाली रासकर यांनी अत्यंत मेहनत घेऊन अहोरात्र तपास करत हा गुन्हा २४ तासांच्या आत उघडकीस आणला.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी