December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

मुंब्र्यात आठ दिवसात तीन कारवाई

६ लाख ३१ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त

  • ३ फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईत सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल जप्त.
  • ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईत सुमारे साडे पाच लाखांची एमडी पावडर जप्त.
  • ७ फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईत सुमारे ३१ हजारांचा गांजा जप्त.

ठाणे

मागील आठ दिवसात मुंब्र्यात विविध ठिकाणी केलेल्या तीन कारवायांमध्ये मुंब्रा पोलिसांनी एमडी मेफेड्रॉन पावडरसह ३ किलो गांजा आणि नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या असा सुमारे सहा लाख ३१ हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका महिलेसह चौघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. तर, अन्य तिघांचा शोध सुरू असून यामध्ये दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंब्र्यातील कौसा येथे एक महिला आणि तिचा साथीदार एमडी पावडर विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून राबिया युनुस शेख वय (२५, रा. माझगाव) आणि मुंब्र्यातील सय्यद रिजवान अली (३०) या दोघांना शुक्रवार, ४ आणि शनिवार, ५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५५ ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त केली. सुमारे ५ लाख ५० हजार रुपये किमतीची ५५ ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याचदरम्यान मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालयासमोर तीन इसम व एक महिला गांजा व नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून मुंब्र्यातील अख्तर उजुअली इराणी ( ४२) आणि अल्ताफ हुसेन मोनबी शेख (३२) यांना अटक केली. त्यांनी स्वतःच्या फायदयाकरीता मानवी जीवनावर गंभीर परिणाम करणारा १० हजार रुपये किंमतीचा १ किलो हिरवट रंगाचा गांजा तसेच नशेसाठी वापरण्यात येणारे औषधी टॅबलेट हे बेकायदेशिररित्या विक्री करण्याचे उददेशाने जवळ बाळगून व बेकायदेशिररित्या विक्री करताना मिळून आले. तो ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणात फरार झालेल्या महिलेसह तिच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. ही कारवाई गुरुवार, ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

त्याचप्रमाणे, मुंब्रा गावदेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम व एक महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकत, साहिल अन्सारी (३२, रा. गोरेगाव) याला ३१ हजार ७३५ रुपयांच्या २ किलो गांज्यासह अटक केली. यावेळी, त्याची साथीदार असलेली महिला पळून जाण्याचा यशस्वी ठरली. ही कारवाई सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

अशाप्रकारे केलेल्या तीन कारवाईत ५५ ग्रॅम एमडी पावडर, तीन किलो गांजा आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कंपनीच्या १८०० गोळ्या असा ६ लाख ३१ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे, पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलीस उप निरीक्षक हर्षद काळे व एन.डी.पी.एस पथकातील पोलीस नाईक धनंजय बोडके, उमेश राजपुत, सोपान पालवे, पोलीस शिपाई भुषण खैरनार, रविदास जाधव, महिला पोलीस नाईक वाजगे या पथकाने केली आहे.