December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Thane Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे आजीमाजी कर्मचारी अटकेत

ठाणे

पेट्रोलपंपावर दरोडा टाकुन तिजोरी लुटून पळून गेलेल्या पाच जणांच्या सराईत टोळीला सातारा, सांगली येथून ताब्यात घेण्यात कापूरबावडी पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून चोरी केलेल्या २७ लाख ५० हजारांपैकी १५ लाख ९०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्यापैकी एक आजी आणि एक माजी कर्मचारी आहे. त्या पाच जणांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ ५ चे उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांनी दिली.

घोडबंदर रोड येथील कापुरबावडी नाक्यावरील ब्रॉडवे ऑटो मोबाईल्स एचपीसीएल पेट्रोलपंपाचे ३१ जानेवारी रोजी रात्री ०२:१५ वाजण्याच्या सुमारास ऑफीसचे दरवाज्याचे दोन्ही ऑटोमॅटिक लॉक कशाचे तरी उघडुन त्यावाटे आतमध्ये प्रवेश करून तिजोरी व तिजोरीतील २७ लाख ५० हजारांची रोख रक्कम चोरी गेली होती. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यावर त्या फुटेजमध्ये चोरट्यांनी आपले चेहरे मास्क लावुन व टोपी घालुन झाकलेले तसेच त्यांनी जॅकेट घातल्याचे दिसत होते. चोरट्यांनी नियोजनबध्द चोरी केल्याने पोलिसांना एक आव्हानच होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार केले. त्यानुसार, घटनास्थळासह इतर ३५ ठिकाणचे सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेजचा बारकाईने अभ्यास केला. याचदरम्यान चोरी झालेल्या ऑफीसचे दरवाज्याचे दोन्ही ऑटोमॅटिक लॉक हे चावीनेच उघडले असावे या संशयावरून पेट्रोलपंपावर सध्या काम करणा-या तसेच यापूर्वी काम सोडुन गेलेल्या कामगारांना पोलीस ठाण्यात आणुन त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला. त्यावेळी पेट्रोलपंपावरून सोडुन गेलेल्या कामगारांपैकी नयन पवार हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याची माहिती पुढे आली. याच माहितीच्या आधारे फुटेजमधील चोरट्यांपैकी एकाची व नयन पवार (२०) याची शरीरयष्टीमध्ये साधर्म्य दिसुन आल्यावर त्याला सांगली येथुन ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्याचे मित्र सुधाकर मोहिते (३४, सांगली), विनोद कदम (२६, सातारा) व भास्कर सावंत (२७, सांगली) आणि पेट्रोलपंपावर कामास असलेला रिलेश मांडवकर (२९, ठाणे) या चौघांनाही ३ फेब्रुवारीला अटक केली.

अटकेतील सुधाकर याने महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याचे तसेच विनोद व भास्कर हे सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले व त्यांचेवरसुद्धा अशाच प्रकारचे आणखी गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे, पोलीस हवालदार शरद खोडे, योगेश वाणी, विजय नाईक, पोलीस नाईक निखिल जाधव, चंद्रभान शिंदे, राजेंद्र पारथी, राजीव जाधव, सचिन काळे, अभिजीत कलगुटकर,शंकर राठोड , तुषार जयतकर, रवी रावते, पोलीस शिपाई राजाराम गारळे या पथकाने केली.