December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

रिक्षा चालकांच्या प्रश्नावर परिवहन आयुक्तांना विविध संघटनांनी दिले निवेदन

कल्याण

रिक्षा चालकांच्या प्रश्नावर मुंबई येथे परिवहन आयुक्त विकास ढाकणे यांची रिक्षा चालकांच्या विविध संघटनांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. ओला-उबेरने सुरु केलेली टू व्हीलर बाइक बंद करण्यात यावी, रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, नव्याने सुरु केलेला वाढीव दंड रद्द करण्यात यावा, यासह इतर विविध प्रश्नांवर विभाग आयुक्तांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, सरचिटणीस शिवाजी गोरे, मुंबई मेन्स रिक्षा युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना काही कंपन्या दुचाकीवर बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करत आहेत. बेकायदेशीर वाहतूक ही कोणतीही कायदेशीर मान्यता नसताना मोबाईल ॲपद्वारे केली जात आहे. तसेच, विविध फायनान्स आणि बँक यांचा मुजोरपणा, कर्जाचे हप्ते न भरल्याने बेकायदेशीरपणे रिक्षा जप्त करणे आदी कारणांमुळे रिक्षाचालक संकटात आहे. त्यात या प्रकारच्या बेकायदेशीर दुचाकी प्रवासी रिक्षाचालक उध्वस्त झालेला आहे. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत कित्येक रिक्षाचालकांनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत.

बेकायदेशीर दुचाकी प्रवासी वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी. मुक्त रिक्षा परवाना त्वरित बंद करण्यात यावा, विविध फायनान्स कंपन्यांचे बेकायदेशीर पद्धतीने होणारी रिक्षा हप्ते, कर्जवसुली विरुद्ध कडक कारवाई करावी, रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. आजच्या तारखेस रिक्षा चालकामध्ये प्रचंड प्रमाणात सरकारविरोधात रोष व संताप निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातील विविध रिक्षा संघटनानी व आम्ही याविरोधात वारंवार निवेदने, आंदोलन, आमरण उपोषण, पत्रव्यवहार केल्यानंतर सुद्धा आजपर्यंत ही बेकायदेशीर वाहतूक बंद करण्यास सरकारला अपयश आलेले आहे किंवा सरकारने कोणतेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे यावर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे कल्याण मधील पदाधिकारी शिवाजी गोरे यांनी दिली.