December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

रस्त्यावर तेल सांडल्याने वाहतूक कोंडी

ठाणे

तीन हात नाका आणि शीळफाटा रोड या दोन रस्त्यावर तेल सांडल्याच्या घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास काही तासांच्या अंतरावर घडल्या आहेत. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून दोन्ही ठिकाणच्या रस्त्यावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता. तेलावर माती पसरविल्यानंतर दोन्ही रस्त्यावरील वाहतुक सुरळीत सुरू झाल्याची माहिती ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सकाळी ८.३० च्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या ठाण्यातील तीन हात नाका परिसरातील रस्त्यावर तेल सांडल्याने काही मिनिटे त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीचा परिणाम शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली तसेच वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. रस्त्यावर सांडलेल्या तेलावर माती पसरवून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिळफाटा नाक्याजवळ, तेल सांडल्याने त्याचा ही परिणाम त्या रस्त्यावरील वाहतुकीवर झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, सांडलेल्या तेलावर माती पसरवली. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. याठिकाणी कोणतीही जीवितहानी नाही, कोणालाही दुखापत नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.