डोंबिवली
लोकशाही बळकट करणे तरुण पिढीच्या हातात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हा संदेश लोकांपर्यंत पोहचेल तसेच वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून भावी लिडर्स तयार होतील. लोकशाही संवर्धन, बळकटीकरण करणे ही नागरिकांची जबाबदारी असून येणा-या निवडणूकीत मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा, असे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले.
२६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राबविल्या जाणाऱ्या, लोकशाही पंधरवडानिमित्त महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळ्यासमयी, सावित्रीबाई फुले कलामंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मतदानाबाबत अधिकाधिक जनजागृती होण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका क्षेत्रात लोकशाही पंधरवडा निमित्त विविध जनजागृती कार्यक्रम करण्यात आले. यामध्ये आजच्या तरुण पिढीमध्ये, नवमतदारांना मतदानाबाबत, निवडणुकीबाबत अधिकाधिक माहिती व्हावी यासाठी लोकशाहीची मुलभूत तत्वे व स्थानिक संस्थेचे महत्त्व, लोकशाहीचे संवर्धन, संरक्षण व बळकटीकरण आणि देशाच्या विकास प्रक्रियेमधील स्थानिक स्वराज्य संस्थेचे महत्त्व या तीन विषयांवर महापालिका क्षेत्रातील १८ वर्षावरील नागरिक, विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी एकूण ५०६ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यामधून परीक्षकांनी पहिल्या फेरीत वीस जणांची निवड केली आणि सावित्रीबाई फुले रंगमंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमात अंतिम फेरीत चार जणांची निवड करण्यात आली. त्यामधील पहिल्या पारितोषिक विजेता स्पर्धक – प्रकाश साबळे यांस ११ हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक विजेती वैशाली जोशी यांना ५ हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह त्याचप्रमाणे दोन उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते अनुक्रमे अविनाश सोनावणे व यश पाटील यांस प्रत्येकी दोन हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे झालेल्या परेडच्या वेळी महाराष्ट्राच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे (भरतनाटय) प्रतिनिधित्व करणा-या डोंबिवली येथील रहिवासी असलेल्या पवित्रा भट ग्रुपच्या १४ कलाकारांचा यावेळी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात महापालिका परिसरातील १८ महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राचार्य यांच्यासमवेत चर्चासत्र संपन्न झाले. निवडणूक आणि मतदान याबाबत महापालिका सचिव व जनसंपर्क विभाग खातेप्रमुख संजय जाधव यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांस प्रश्नोत्तराच्या माध्यमातून बोलते केले आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आयुक्त डॉ. सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपायुक्त निवडणूक सुधाकर जगताप, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. रामदास कोकरे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या स्पर्धेसाठी देविदास मुळे, प्रविण दुधे आणि ऐश्वर्या सुतार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दत्तात्रय लदवा यांनी केले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर