December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Kalyan Crime : पोलिसांना घाबरवणारा सूरज अटकेत

बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने घेतले पिस्टल तस्कराला ताब्यात

कल्याण

पाठलाग करणाऱ्या पोलिसांना घाबरविण्यासाठी जमिनीच्या दिशेने गोळ्या झाडणाऱ्या सूरज शुक्ला (२४, रा. मध्य प्रदेश) या पिस्तूल तस्कराला बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडील २ पिस्टल, २ मॅगझीन आणि १६ काडतुस जप्त करण्यात आले आहेत.

पश्चिमेतील लाल चौकी परिसरात एक जण अवैध पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पथकाने आज सकाळच्या सुमारास या परिसरात सापळा रचला. यावेळी एक जण संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी त्याला हटकले. त्याच्या कमरेला लावलेले एक पिस्टल पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी, सूरजने पोलिसांसोबत झटापटी करून त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाणाऱ्या सूरजने त्याच्याजवळील पिस्टल काढून फुटपाथवर गोळ्या झाडल्या. मात्र, पोलिसांनी न घाबरता काही अंतरापर्यंत पळून गेलेल्या सूरजला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या सूरजला कल्याण न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सहा. पोलीस आयुक्त (कल्याण) उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पो.निरी. (गुन्हे) राजेंद्र अहिरे, पो.निरी. सुनिल पवार, गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित मुंढे, अरुण घोलप, हवालदार पायरी, अत्तार, जातक, भोसले, पो.ना सचिन साळवी, बागूल, बाविस्कर, सांगळे, पोशि चव्हाण व चालक पोलीस शिपाई भोरे यांनी हि उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि मुंढे करीत आहेत.