रत्नागिरी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी ०७ नोव्हेंबर हा ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करावा, अशी सूचना महामहिम राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज येथे केली.
मंडणगड तालुक्यातील डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक भेट देऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू उर्फ दादा इदाते हे व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले की, ०६ डिसेंबर हा डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिवस’ म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जात आहे. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांची जयंती सर्वत्र साजरी होते. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ०७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. कारण याच दिवशी १९०० साली बाबासाहेबांनी शाळेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षणास सुरूवात केली होती. मला असे वाटते की, हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून राष्ट्रीय पातळीवरील डॉ. आंबेडकरांच्या शिक्षण विषयक ओढ आणि निष्ठेचे स्मरण करुन देण्यासाठी तो साजरा करणे आवश्यक आहे. येथे बसलेल्या संसदेतील सदस्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, मी त्यांना माझ्या परीने मदत करीन.
आंबडवे येथील स्मारकाचाही तीर्थस्थळांमध्ये समावेश करावा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याशी संबधित पाच ठिकाणांना पंचतीर्थाचे नाव देऊन केंद्र सरकारने या सर्व ठिकाणी आदंराजली अर्पण करण्याची स्तुत्य पध्दत सुरु केली आहे. त्यांची जन्मभूमी, नागपूरची दीक्षा भूमी, दिल्लीचे परिनिर्वाण स्थळ, मुंबईची चैत्यभूमी आणि लंडनमधील आंबेडकर मेमोरियल होम या पाच ठिकाणी बाबासाहेबांचा आदर्श मानणारे लोक श्रध्दाजंली अर्पण करतात. माझी केंद्र सरकारला अशी सूचना आहे की, याच मालिकेत बाबासाहेबांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथील स्मारकही तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात यावे आणि या गावाचे स्फूर्तीभूमी असे नामाभिधान करण्यात यावे, असेही राष्ट्रपतींनी यावेळी म्हटले.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न