December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

डोंबिवलीकरांनी अनुभवले निरक्षर स्त्रियांचे सृजनधन

डोंबिवली

शिक्षणाचा अधिकार नसताना अखंड लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्त्रियांनी आपल्या भावभावनांना ओव्या, म्हणी आणि उखाण्यांतून वाट मोकळी करून दिली होती. खऱ्या अर्थाने चारोळ्या, विनोदी कवितांच्या जनक महिलाच असून त्यांनीच बहुतांश बडबडगीते रचली. मराठी भाषेतील स्त्रियांच्या सृजनशिलतेचे हे दर्शन रविवारी डोंबिवलीकरांनी अनुभवले. डोंबिवलीतील के. बी. विरा शाळेच्या पटांगणात आयोजित ग्रंथोत्सवात लेखिका आणि निवेदिका दीपाली केळकर यांनी स्त्रीधन हा कार्यक्रम सादर केला.

साहित्यायात्रा, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्वेतील के. बी. विरा शाळेच्या पटांगणात ४ फेब्रुवारीपासून ग्रंथ प्रदर्शनाचे सुरू आहे. येत्या २७ फेब्रुवारी अर्थात मराठी भाषा दिनापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील रविवारी प्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका दीपाली केळकर यांचा स्त्रीधन हा कार्यक्रम पार पडला. महिलांना निर्मिलेल्या आणि मौखिक परंपरेने जंपलेल्या अक्षर श्रीमंतीची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी मांडली. एकेकाळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांना अनेक अधिकारही नव्हते. अखंड लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्रियांनी आपल्या भावभावना ओव्या, म्हणी आणि उखाण्यांतून मांडल्या, असे सांगत दीपाली केळकर यांनी स्त्रियांचे अनुभवविश्व उलगडले.

स्त्रियांनी स्वःतचे मन रमविण्यासाठी विचारांना ओवीबद्ध केले. आपल्या भावभावना नेमक्या आणि अचून शब्दात मांडणे म्हणजेच ओवी. त्यामुळे बहुतेक सर्व संत साहित्य ओवीच्या रूपानेच आपल्यापर्यंत आले असे सांगत स्त्रियांच्या सृजनशिलतेचे महत्व केळकर यांनी यावेळी पटवून दिले. महिलांनीही त्यांच्या विचारांना वाट मोकळी करून देण्यासाठी ओवी, म्हणी आणि उखाण्यांचा आधार घेतला आणि त्यांचे जगणे सुसह्य झाले. कौटुंबिक ताणतणाव दूर करण्यासाठी स्रियांना कोणत्याही मानसोपचार तज्ज्ञाची गरज पडली नाही, असेही केळकर यावेळी म्हणाल्या. आपल्या मनात आलेले सारे विचार त्या जात्याजवळ बोलून मोकळ्या होत होत्या. चारोळ्या आणि विनोदी कविता या साहित्य प्रकाराच्या आद्यजनक महिलाच आहेत. बहुतेक सारी बडबडगीते स्त्रियांनीच रचली आहेत, असेही केळकर यांनी सांगितले.

पारंपारिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारचे हुमाण म्हणजे कोडी घालून दीपाली केळकर यांनी कार्यक्रमात रंगत आणली. अचूक उत्तर देणाऱ्या श्रोत्यांना त्यांनी पुस्तके भेट दिली. सव्वातास सुंदररित्या रंगलेल्या या कार्यक्रमाच्या अखेरीस राष्ट्रीय महिला दिनाचे- म्हणजेच सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनाचे स्मरण केळकर यांनी केले. या कार्यक्रमाला रसिकांनी भरगच्च प्रतिसाद दिला. सच्चिदानंद शेवडे, दुर्गेश परूळेकर, दीपाली काळे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.