जया शोभा किसन वाघमारे

मलंगगडाला जाताना रस्त्याच्या दुतर्फा पाहिले असता बरेच लहान-मोठे माळरान, काही उंच तर काही ठेंगणे अशा पठाररांगा, गवताळ भाग, मध्येच गर्द झाडी आणि स्थानिकांची शेती असा परिसर नजरेस शांत तर मनास आनंद देतो.

खरड गाव, मलंगगडाला जाताना वाटेत येणारे हे गाव. कल्याण डोंबिवलीतील पक्षी निरीक्षकांना आता नवखे राहिले नाही. या गावानजीक असलेला नैसर्गिक अधिवास हा जैवविविधतेला आश्रय देतो. गवताळ प्रदेश, पठार, मध्येच गर्द झाडी आणि तेथे राहणाऱ्या स्थानिकांची शेती. अशा वैविध्यपूर्ण अधिवासात निरनिराळ्या प्रकारचे कीटक, प्राणी, सरीसृप आणि पक्षी हे अन्नसाखळीत एकमेकांचे भक्ष किंवा भक्षक बनतात. असाच एक अन्नसाखळीचा अविभाज्य भाग म्हणजे पक्षी.

रविवार, ६ फेब्रुवारी रोजी पक्षांचे निरीक्षण करण्यासाठी मी खरड गावानजीक पक्षी निरीक्षण उपक्रम आयोजित केला होता. साधारणतः सकाळी ८ वाजता सतीश सप्रे, विनोद कुलाल, शुभांगी के., स्वप्नील सप्रे, प्रमोद पगार, पराग सकपाळ आणि मी सर्वजण जमलो आणि पक्षी पाहू लागलो, ह्या उपक्रमासाठी पराग सकपाळ (एम. एसी. सी सूक्ष्मजीव शास्त्र) निसर्ग अभ्यासक मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सुरुवातीलाच आम्हाला पिवळ्या डोळ्यांच्या सातभाईचे दर्शन झाले, त्यानंतर दयाळ, चिरक, पायमोज वटवट्या, राखी वटवट्या, चिमण्या, डोम कावळे, कावळे, शिंपी, कबुतर आणि खाटीक हे पक्षी दिसले. काही अंतरावर कोतवाल एकटाच झाडावर आमच्याकडे पाठ करून बसलेला, ठिबकेदार होला, छोटा होला, रान चिमणी हे पक्षी एक -एकटे तर लाल मनोली, ठिबकेवाली मनोली, काळ्या डोक्याचा भारीट यांचे थवे अधून मधून दिसत होते.

साळुंखी पक्ष्यांच्या किलबिलाटाकडे लक्ष असतानाच निळ्याशार अश्या भारतीय निलकंठाणे दर्शन दिले. मधूनमधून भारद्वाज हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडताना तर आकाशात वेड्या राघूचे कीटक भक्षण दिसत होते. कोकीळ, टिटव्या यांचा आवाज ऐकतानाच दूर अंतरावर पांढऱ्या मानेचा करकोचा, माळरानात उतरताना दिसला रंगीत करकोचे, काळे शराटी यांचे थवे उडताना पाहून फार छान वाटले. तांबूस शेपटीचे चंडोल एका माळरानातून दुसऱ्या माळरानात उडताना तर मध्येच सामान्य गप्पीदास एखाद्या गवताच्या काडीवर येउन पंख फडफडवताना दिसायचा, गाय बगळे खाद्य टिपताना, ढोकरी आकाशात, लालबुड्या बुलबुल झाडावर तर घार आकाशात घिरट्या घालताना दिसली.

सुरुवातीपासूनच शिक्रा या शिकारी पक्ष्याने बऱ्याच वेळा आपले दर्शन दिले होते, त्याचबरोबरीने कापशी, दलदली भोवत्या, मॉँटगुचा भोवत्या हे शिकारी पक्षीही सतत दिसत होते. काही वेळाने पठारावरील विजेच्या पोलवर दोन नेपाळी गरुड बसलेले आहेत. हे ज्यावेळी परागने सांगितले तेव्हा आम्हा सर्वांना फार आंनद झाला. सकाळी ९.३०-१० च्या सुमारास आकाशात बरेच शिकारी पक्षी घिरट्या घालताना दिसू लागले. त्यात सरडमार गरुड, मोठा ठिबकेदार गरुड, छोटा ठिबकेदार गरुड, तिसा, सामान्य नारझिनक या सर्व स्थलांतर करणाऱ्या शिकारी पक्ष्यांचा समावेश होता. १०.३० होता होता आम्ही ५० हुन अधिक पक्षी पाहिले, प्रत्येक पक्षी दिसल्यावर पराग त्या पक्षाच्या शारीरिक रचना, खाद्य, अधिवास, सवयी आणि त्यांना ओळखण्याच्या खुणा ही सर्व माहिती देत होता आणि सहभागी ती माहिती ऐकत, फोटो टिपत गंमतीने निसर्ग अभ्यास करत होते. अशा प्रकारे आम्ही जवळजवळ ०२ ते ०२.३० तास खरड गावानजीकच्या भागात आमची रविवारची सकाळ निसर्गाच्या सानिध्यात व्यतीत केली.
पक्ष्यांचे सर्व फोटो – स्वप्नील सतीश सप्रे
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू