December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

KDMC Election : …तर सूर्य कुठूनही उगवू शकतो : आमदार गायकवाड

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीकडे नगरसेवकच नव्हे तर मतदारही डोळे लावून असतानाच कल्याण-डोंबिवलीतील प्रभाग रचनेतील घोळात घोळ समोर आला. केडीएमसी प्रभाग रचनेत इतका घोळ झालाय की उल्हासनगर महापालिकेचा काही भाग सुद्धा केडीएमसीच्या प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आला आहे.

कल्याण

सत्ता आली तर सूर्य कूठूनही उगवू शकतो अशी मला खात्री वाटते, असा टोला भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी लगावला आहे. प्रभाग रचनेच्या घोळावरून गायकवाड यांनी राज्य सरकारवर टीका केली.

कल्याण डोंबिवली महापालिकेची प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी जाहिर झाली. पालिका क्षेत्रात एकूण ४४ पॅनल आणि १३३ प्रभाग आहेत. निवडणूक आयोगाने हरकती सूचनांसाठी १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. त्याचा आजचा शेवटचा दिवस होता. डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रभाग रचनेवरुन आक्षेप घेतल्यानंतर कल्याण पूर्व विभागाचे भाजप आमदार गणपत गायकवाड, कल्याण पूर्व शहराध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के यांच्या सोबत आज महापालिका मुख्यालयातील निडणूक कार्यालयात येऊन प्रभाग रचनेसंदर्भात हरकती घेतल्या.

आठ पॅनलमध्ये चुकीची रचना

गायकवाड यांनी आठ पॅनलमध्ये चूकीच्या पद्धतीने रचना केली गेली असल्याची मुख्य हरकत घेतली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, उल्हासनगरातील काही भाग केडीएमसीत समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग रचना करणारे महापालिका अधिकारी पालिका क्षेत्रात फिरले सुद्धा नाही असे वाटते. शिवसेनेला कसे जास्त मतदान होईल या दृष्टीने प्रभाग रचना करण्यात आली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. प्रभाग रचना कुठून होणार याची दिशा सुद्धा बदलण्यात आली आहे. टिटवाळापासून सुरु होणारा प्रभाग थेट उंबर्डेपासून सुरु केला आहे. म्हणजेच सत्ता असली तर सूर्य कुठूनपण उगवू शकतो अशी मला खात्री वाटते, अशी टीका गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे.

त्यांचे आम्हाला दुःख नाही

जे नगरसेवक गेले आहेत, ते आमचे कधीच नव्हते. निवडणुकीपूर्ते हातापाया पडून आले होते. जे गेले आणि जे जाणार आहेत त्यांचे आम्हाला काही एक दु:ख नाही. आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि ते पक्षासाठी काम करत आहेत, असंही गायकवाड यांनी सांगितलं.