डोंबिवली
महिलेची निर्घृणपणे हत्या करुन तिच्याच घरातील सोफ्यामध्ये मृतदेह लपवून मारेकरी पसार झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. पती कामावर गेल्यावर सुप्रिया शिंदे या महिलेची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मानपाडा पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.
पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सीमध्ये राहणारे किशोर शिंदे सकाळी कामावर गेले. त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मुलगा दुपारी साडे बारा वाजता शाळेत गेला होता. संध्याकाळी किशोर हे कामावरुन घरी परतले तेव्हा पत्नी सुप्रिया घरात नव्हती. त्यांनी तिचा शोध घेतला. ती कुठेही आढळून आली नाही. मित्र मंडळी नातेवाईकांसह सगळीकडे विचारपूस केली. तरी कुठे गेली आहे हे समजून आले नाही. याच दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक घरात आले. किशोर हे पत्नी हरविल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्यात पोहचले होते. रात्र झाली होती. घरात आलेल्या शेजाऱ्यांना सोफा अस्तवस्त दिसून आला. त्यांनी तो सोफा चाचपला. त्यावेळीच त्यांना सुप्रिया हिचा मृतदेह सोफ्यात कोंबून ठेवल्याचे आढळून आले. सुप्रिया हिची गळा आवळून हत्या करण्यात आली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलिस निरिक्षक अनिल पडवळ आणि सहा. पोलिस निरीक्षक अविनाश वनवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुप्रिया हिचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला आहे. तिची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर