December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

आलोकेश लाहिरी ते बप्पीदा…

आलोकेश लाहिरी ते बप्पीदा हा त्यांचा प्रवास येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणास्रोत ठरावा असाच आहे. या मनस्वी कलाकाराला त्याच्या प्रतिभेला अखेरचा सलाम....

दैवी स्वराची देणगी लाभलेल्या ‘बप्पीदा’ नामक या मनस्वी कलाकाराच्या जीवनप्रवासावर एक कटाक्ष…

 

विशेष प्रतिनिधी

यंदाच्या वर्षाच्या प्रारंभीच विविध क्षेत्रांमधील दिग्गजांनी इहलोकीची यात्रा संपविली. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर आदींचा समावेश आहे. आता त्यात भर पडली आहे ती ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांची. आपल्या हटक्या संगीताने हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केलेले, जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लाहिरी यांचे मंगळवारी रात्री मायानगरी मुंबईत निधन झाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जाऊन दहा दिवस होत नाहीत तोच हिंदी चित्रपटसृष्टीला बप्पी लाहिरींच्या निधनाने आणखी एक धक्का बसला. भारताला ‘डिस्को’ संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जाणारे बप्पीदा यांच्या जाण्याने गायन आणि संगीत क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या गायकीतून आणि संगीताच्या माध्यमातून तरूणाईसह आबाल-वृद्धांच्या मनात घर करून बसलेल्या दैवी स्वराची देणगी लाभलेल्या ‘बप्पीदा’ नामक या मनस्वी कलाकाराच्या जीवनप्रवासावर एक कटाक्ष…

मनोरंजन विश्व आणि बॉलिवूडमध्ये ‘बप्पीदा’अशी ओळख असलेले बप्पी लाहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला होता. त्यांचे आई-वडील अपरेश लाहिरी आणि बन्सुरी लाहिरी हे दोघेही बंगाली गायक, तर शास्त्रीय आणि श्यामा संगीतातील संगीतकार होते. संगीताचे धडे त्यांनी घरीच गिरवले. बप्पीदांनी आपल्या कारकिर्दीत गायलेल्या-संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. बप्पी लाहिरी यांनी १९७०-८० च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली. भारतीय चित्रपटात सिंथेसाईज डिस्को संगीताचा वापर बप्पीदांनी लोकप्रिय केला आणि स्वत:च्याही काही रचना गायल्या. संगीत दिग्दर्शक या नात्याने बप्पी लाहिरी यांनी सुमारे साडेसहाशे चित्रपटांना संगीत दिले आहे. हिंदी, बंगाली व्यतिरिक्त त्यांनी जवळपास सर्व भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच, पाच हजारांहून अधिक गाणी रचली आहेत.

‘बंबई से आया मेरा दोस्त…’, ‘देखा है मैंने तुझे फिर से पलट के तू मुझे जान से भी प्यारा है…’, ‘याद आ रहा है तेरा प्यार…’, ‘सुपर डांसर आये हैं आये हैं…’, ‘जीना भी क्या है जीना…’, ‘यार बिना चैन कहां रे…’, ‘तम्मा तम्मा लोगे…’, ‘प्यार कभी कम मत करना…’, ‘दिल में हो तुम…’, ‘बंबई नगरिया…’, ‘उलाला उलाला…’ ही त्यांची गाणी आजही सर्व पिढ्यांतील रसिकांच्या विशेषत: तरूणाईच्या ओठांवर येतात.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने त्यांनी विशेष ओळख निर्माण केली. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार या बप्पी लाहिरी यांच्या सुपर हिट गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. बप्पी लाहिरी यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी तबला शिकण्यास सुरुवात केली. बप्पी लाहिरी यांनी १९ व्या वर्षी कोलकातामधून मुंबईमध्ये येण्याचा निर्णय घेतला. १९८६ मध्ये बप्पीदांनी ३३ चित्रपटांतील १८० गाणी ध्वनीमुद्रित केली होती. या कामगिरीची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

१९७३ मध्ये ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून संगीतकार म्हणून पदार्पण केलेल्या बप्पी लाहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांनी तरुणाईला अक्षरश: वेड लावले होते. त्यांच्या संगीतातील ही जादू कायम होती. त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेले (सिनेमा डर्टी पिक्चर) ‘उलाला उलाला’ हे गाणे चांगलेच लोकप्रिय ठरले. हिम्मतवाला, शराबी, ॲडव्हेंचर्स ऑफ टारझन, डान्स डान्स, सत्यमेव जयते, शोला और शबनम यांसारख्या तुफान गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी संगीतबद्ध केली. वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, गँग लीडर, सैलाब यांसारख्या सिनेमांतील त्यांची गाणी प्रचंड गाजली होती. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी-३ चित्रपटात ‘भंकस’ नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे ठरले.

बप्पीदांनी संगीत साज चढविलेली अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. यात ‘आओ तुम्हे चांद पे ले जाएं’, ‘जलता है जिया मेरा भीगी भीगी रातो में…’, ‘पग घुंघरू बांध मीरा नाची थी’, ‘जिमी जिमी जिमी आजा आजा…’ ही गाणी खास ठरली. १९८४ मध्ये ‘शराबी’ सिनेमातील संगीतासाठी त्यांना पहिल्यांदा सर्वश्रेष्ठ संगीतकारासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. बप्पी लाहिरींना सोन्याची फार आवड होती. त्यांनी परिधान केलेले सोने हा कायम चर्चेचा विषय असायचा. बप्पी दा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मी अमेरिकन पॉपस्टार एल्विस प्रेस्लीपासून खूप प्रभावित होतो. पॉपस्टार एल्विस प्रेस्लीने त्याच्या कॉन्सर्टमध्ये सोन्याची चैन घातली होती. एल्विस प्रेस्लीला पाहिल्यानंतर मला वाटायचे की, जेव्हा मी एक यशस्वी व्यक्ती बनेन, तेव्हा मी स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार करेन. प्रेस्लीपासून प्रेरित होऊन, मी सोनेरी वस्तू परिधान करतो आणि ते माझ्यासाठी भाग्यवान आहे. बप्पीदांनी राजकीय क्षेत्रातही स्वत:ला अजमावून पाहिले. त्यांनी आपले गृहराज्य असलेल्या पश्चिम बंगालमधून लोकसभेची निवडणूकही लढविली होती. मात्र ते क्षेत्र त्यांना फलदायी ठरले नाही. दैवी स्वराची देणगी लाभलेला हा अवलिया कलावंत आपल्या सोनेरी गळ्याची सुगंधी दरवळ सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. आलोकेश लाहिरी ते बप्पीदा हा त्यांचा प्रवास येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणास्रोत ठरावा असाच आहे. या मनस्वी कलाकाराला त्याच्या प्रतिभेला अखेरचा सलाम….