April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

रोपांच्या माध्यमातून साकारली शिवरायांची प्रतिमा

कल्याण

गेल्या ३६ वर्षाची परंपरा असलेल्या कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिव जयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने या वर्षीच्या शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी सहा हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली आहे.

तिसगांवातील तिसाई देवी मंदीराच्या प्रांगणात साकारण्यात आलेली ही प्रतिमा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि कलेतून साकारण्यात आली आहे. शिव प्रतीमेची ही कला कृती प्रत्यक्ष कृतीत उतरण्यासाठी रुपेश गायकवाड हे स्वतः गेली महिना भर आपल्या निवास स्थानी प्रायोगिक पद्धतीने सराव करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून १५ हजार चौरस फुटांची ही भव्य कलाकृती तिसाई देवीच्या चरणी समर्पीत करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही शिव जयंती उत्सवावर कोवीडचे संकट कायम असल्याने १९ फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंती दिनी तिसाई देवीच्या प्रांगणात शिव जयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिव प्रतिमेचे पुजन होणार आहे. त्यानंतर विविध संस्था संघटनांना वृक्ष रोपांचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी शिव प्रतिमेत वापरण्यात आलेल्या वृक्ष रोपांचेही विविध संस्था संघटनांना वृक्ष वाटप करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रुपेश गायकवाड, सचिव राजु अंकूश आणि विश्वस्त नरेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले.