April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

पालकमत्र्यांना `होम ग्राऊंड’ वरच दिला भाजपने धक्का

किसननगरमधील शिवसैनिक भाजपात

ठाणे

राज्याचे नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाने`होम ग्राऊंड’ वरच जोरदार धक्का दिला आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या किसननगरमधील शाखाप्रमुखासह ३०० शिवसैनिकांनी रविवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी शिवसैनिकांचे स्वागत केले.

शिवसेनेच्या किसननगर नं. २ चे शाखाप्रमुख समीर नार्वेकर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेचे निरीक्षक निलेश लोहोटे, उपशाखाप्रमुख पंकज परब, भरत देसाई, आशिष चव्हाण, नितेश पवार यांच्यासह ३०० शिवसैनिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात हा कार्यक्रम झाला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांत किसननगर नं. एक, दोन, तीन आणि चारबरोबरच पडवळनगरमधील शिवसैनिकांचा समावेश आहे.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य असून, किसननगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. किसननगरमधूनच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवड होत होती. या भागात शिवसेनेचे संघटनात्मक जाळे मजबूत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. मात्र, भाजपाने शिवसेनेच्या किसननगरमधील अभेद्य तटबंदीलाच खिंडार पाडले आहे. शिवसेनेच्या किसननगरमधील शाखाप्रमुखानेच भाजपात प्रवेश केल्याने ठाणे शहरात शिवसेनेला हादरा बसला. तर, भाजपाच्या खोपट कार्यालयाच्या परिसरात वागळे इस्टेटमधील शिवसैनिकांनी गर्दी केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेत खळबळ उडाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून देशाचा विकास सुरू आहे. तर शिवसेनेकडून नागरिकांना दिलेली प्राथमिक आश्वासनेही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे आपण भाजपाचे कार्य करणार आहोत, असे समीर नार्वेकर यांनी सांगितले.