December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Thane : मीरा भाईंदरकरांनो पाणी जपून वापरा

ठाण्यात जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तुटला

ठाणे

ठाण्यातील माजीवडा येथे मीरा भाईंदर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी स्टेमची १३५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला ट्रक जाऊन आढळल्याने त्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तुटल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे आकाशात उडत होते. तसेच या तुटलेल्या व्हॉल्व्हमुळे लाखो लीटर पाणी वाया गेले असून रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसून मीरा भाईंदर महापालिकेने माहिती मिळताच जलवाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करू व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम हाती घेतले. १३५०मिमी जलवाहिनी फुटल्याने काही तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. तसेच दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावरती सुमारे ८ तासानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

ठाण्यातील माजीवडा बस थांबा जवळून मीरा-भाईंदर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी स्टेमची जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिनीवर माजीवडा नाक्यावर एक व्हॉल्व्ह आहे. त्याच व्हॉल्व्हला मंगळवारी दुपारी चालक शेख पठाण याचा ट्रक आढळल्याने तो व्हॉल्व्ह जमिनीवर तुटून पडला. त्या तुटलेल्या व्हॉल्व्हच्या जागेला पडलेल्या छिद्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होऊन ते पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे रस्त्यावरून लाखो लीटर पाणी वाया गेले. ही जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह ठाणे महापालिका पाणी पुरवठा अधिकारी- कर्मचारी, कापूरबावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबत मीरा भाईंदर महापालिकेला माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.

तर, माजीवाडा जंक्शन येथील स्टेम प्राधिकरणाच्या १३५० मिमी पाईपलाईनला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचा एअर व्हॉल्व्ह तुटला असून दुरुस्ती काम हाती घेतले आहे. यासाठी पाच ते सहा तास पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. तसेच स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पुर्ववत होईपर्यत मिरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होईल. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यकारी अभियंता (पा.पु.) सुरेश वाकोडे यांनी केले आहे.