कल्याण
कल्याण शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत झाली असून सिग्नल तोडणाऱ्यांवर कारवाईस सुरवात करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौक, खडकपाडा चौक, संदिप हॉटेल येथील चौक, प्रेम ऑटो पौर्णिमा चौक येथे नागरीकांच्या सुखसोयी करीता तसेच वाहतूक कोंडी टाळणे, अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता व वाहन चालकांना शिस्त लागण्याकरीता सिग्नल यंत्रणा व सीसीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बसविण्यात आलेले आहेत.
या चौकातील सिग्नल यंत्रणा व ई- चालान कारवाई आज केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, स्मार्ट सिटी कल्याणचे इंजिनिअर, केडीएमसीचे संबंधीत अधिकारी, वाहतूक शाखेचे सहा. आयुक्त मंदार धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर वाहतुक उपशाखा कल्याण, डोंबिवली व कोळसेवाडी यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आली.
वाहतूक नियमांचे सिग्नल जंपीग व स्टॉप लाईन उल्लंघन करणाऱ्या कसूरदार वाहनांवर ऑनलाईन इ चालानद्वारे कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहिल्यांदा सिग्नल तोडल्यास ५०० रुपये दंड तर दुसऱ्यांदा सिग्नल तोडल्यास १५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
वाहन चालवत असताना चौकामधील वाहतूक नियमनाकरीता बसविण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेतील लाल-पिवळया हिरव्या रंगाच्या सिग्नलचे तंतोतत पालन करून, चौकामध्ये असलेल्या सफेद रंगाचे स्टॉप लाईन चे काटेकोरपणे पालन करावे. आपल्याकडून सदर नियमांचा भंग झाल्यास आपले वाहनावर चौकामध्ये बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेरामधून आपण केलेल्या कसुरीकरीता कसुरदार वाहनावर प्रचलित मोटर वाहन कायदयान्वये ऑनलाईन दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. तसेच सिग्नल अगर स्टॉप लाईनचे उल्लंघन व इतर ऑनलाईन चालानच्या दंडात्मक कारवाईबाबत काही तक्रार अगर शंका असल्यास महा ट्राफिक अॅप आपले मोबाईलमध्ये समाविष्ट करून त्याचा वापर करावा याची कल्याण शहरामधून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर