December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

पक्ष्यांच्या दुनियेत वावरताना

पक्ष्यांच्या दुनियेत वावरताना; भांडुप पंपिंग स्टेशन पक्षी निरीक्षण केंद्र

बीपीएस येथे पक्ष्यांचे छायाचित्र काढताना

पराग वर्षा विष्णू सकपाळ

भांडुप पंपिंग स्टेशन (बी. पी. एस) पक्षी निरीक्षण केंद्र हे मुंबईच्या आजूबाजूच्या सर्वोत्कृष्ट पक्षी निरीक्षण ठिकाणांपैकी एक आहे. बी.पी.एस. अतिशय वैविध्यपूर्ण पर्यावरण शास्त्राने परिपूर्ण आहे. त्यात खारपट्टे, गवताळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश आणि खाडीचा किनारा यांचा समावेश आहे.

अनेक पक्षी अभ्यासक इथे नियमित पक्षी निरीक्षणासाठी येत असतात. अनेक पर्यावरण प्रेमी इथे आपला पक्षी निरीक्षणाचा उपक्रम आयोजित करत असतात.
१३ फेब्रुवारी २०२२ रोजी बी. पी. एस. येथे अशाच एका उपक्रमाचे आयोजन जया वाघमारे (झूलॉजिस्ट) यांनी केले होते . त्या पक्षी निरीक्षणासाठी पराग सकपाळ, सतीश सप्रे आणि स्वप्नील सप्रे हे उपस्थित होते. मी (एमएससी. मायक्रोबायोलॉजी) हया पक्षी निरीक्षणाच्या कार्यक्रमाचा निसर्ग अभ्यासक, मार्गदर्शक होतो.

आम्ही मुख्य महामार्गावरून बी. पी. एस.च्या रस्त्यात प्रवेश करताच, काही लाल बुडाचा बुलबुल (Red Vented Bulbul), शिपाई बुलबुल (Red Whiskard Bulbul), शुभ्रकर्ण बुलबुल (White Eared Bulbul) यांनी सकाळच्या वेळेला त्यांच्या पार्श्वगायनात आमचे स्वागत केले. कडेलाच असलेल्या (Oriental Magpie Robin) दयाळचे गाणे ऐकत आम्ही पुढे गेलो. काही अंतरावर आकाशात पणकावळा (Cormorents) नावाचे पक्षी साधारणतः ५-१० च्या कळपात उडत होते. मी सहभागींना कॉरमोरंट ओळखण्याबद्दल सांगत असताना आम्हाला आमच्या डोक्यावरून एक चमच्या (Eurasian Spoonbill) नावाचा पक्षी उडताना दिसला. हा पक्षी आपल्या भागात हिवाळी पाहुणा असल्यामुळे आणि त्याचा चोचीची बनावट चमच्याचा आकाराची असल्यामुळे त्याला बघून पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी असलेले सर्वच अधिक उत्साहित झाले.

रस्त्यावरून चालत असताना अनेक प्रकारचे छोटे पक्षी किलबिलाट करत होते. त्यात फुलटोचा (Flowerpeckers), सुर्यपक्षी (Sunbirds), वटवट्या (Prinias), (Warblers) यांची हालचाल बऱ्याच प्रमाणात होती. अधूनमधून आम्हाला (Golden Oriole) हळद्या आणि ( Long Tailed Shrike) नाकल्या खाटीक पक्षी त्याची उपस्थिती सांगत होते. काही अंतरावर एक झाडावर दोन भारद्वाज (Coucal ) पक्षी बसलेले दिसले. दलदली भोवत्या (Marsh Harrier) जवळच आवाज देत उडत होता.

पुढे खाडी किनाऱ्यावर भुवई बदक (Garganey), थपट्या बदक (Northern Shoveler)  आणि हळद-कुंकू बदक (Spot Billed Duck) हे पक्षी आनंदाने पाण्यात स्वैर करत होते. जवळच तुतारी (Common Sandpiper), ठिपकेवाला तुतारी (Wood Sandpiper) आणि शेकाट्या (Black Winged Stilt) हे पक्षी फीडिंग करत होते. तिथेच आम्हाला काळया डोक्याचा शराटी (Black Naked Ibis) ची आहार क्रियाकलाप (Feeding Activity) पाहायला मिळाली.
नजीकच असलेल्या तळ्याजवळ जाताच शेकडोंचा संख्येत मोठा रोहीत (Greater Flamingoes) नावाचे पक्षी पाहताच आम्ही फार उत्साहित झालो. त्या Famingoes चा कळपात राखी बगळा (Grey Herons) नावाचे पक्षी सुद्धा होते.
स्वप्नीलला सुगरण (Baya Weaver) नावाचा पक्षाचा चांगला फोटो मिळाला नाही. हे त्याने सांगताच थोड्या वेळातच त्याचा मनातील ती इच्छा Baya Weavers च्या फ्लोकने लगेच पूर्ण केली. मग पुढे जाऊन सतीश सरांची निळया शेपटीचा वेडा राघू (Blue Tailed Bee Eater) बघण्याची इच्छा ही लगेच पूर्ण झाली. तिथेच आम्हाला तारवाली पकोळी (Wire Tailed Swallows) ने तर अगदी ४ फीट इतक्या जवळून दर्शन दिले. पुढे, सरडमार गरुड (Booted Eagle) आणि शिकरा (Shikra) नावाचे शिकारी पक्षी ( Raptors ) बघून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

पक्ष्यांचे सर्व छायाचित्र — स्वप्नील सतीश सप्रे

हेसुद्धा वाचा — पक्ष्यांच्या दुनियेत वावरताना