आतापर्यंत पाच हजारांहून अधिक पुस्तकांची विक्री
डोंबिवली
डोंबिवलीतील के. बी. विरा शाळेच्या पटांगणावर आयोजित ग्रंथोत्सवात आतापर्यंत पाच हजारांहून अधिक पुस्तकांची विक्री झाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, शिवसेना शहर शाखा- डोंबिवली आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुस्तक प्रदर्शनात ४० हून अधिक प्रकाशकांची हजारो पुस्तके मांडण्यात आली आहेत. व्यक्तिमत्व विकास, आत्मचरित्र, चरित्र, आरोग्य आदी विषयांच्या पुस्तकांना वाचक अधिक पसंती देताना दिसत आहेत. मराठीबरोबरच इंग्रजी पुस्तकांचाही स्वतंत्र विभाग प्रदर्शनात आहे.
कोरोना संसर्ग काळात ग्रंथ व्यवहार जवळपास ठप्प झाला होता. मात्र, आता इतर क्षेत्राप्रमाणे ग्रंथ विक्री व्यवहारही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. वाचकांची भूक भागवण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात पुस्तक प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा संयुक्त उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. डिसेंबर महिन्यात अंबरनाथ शहरात सर्वप्रथम याला सुरुवात झाली. अंबरनाथ शहरात वाचकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर सुमारे ७ हजार पुस्तकांची विक्री झाली होती. त्यामुळे डोंबिवलीतही अशाच प्रकारे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, शिवसेना शहर शाखा डोंबिवली आणि साहित्ययात्रा यांच्या माध्यमातून डोंबिवली पूर्वेतील के. बी. विरा शाळेतील पटांगणात आयोजित करण्यात आले आहे. पुस्तक प्रदर्शनाला पहिल्या आठवड्यात काहीसा थंड प्रतिसाद मिळाला. परंतु दुसऱ्या आठवड्यापासून डोंबिवलीत सर्वत्र प्रदर्शनाची वार्ता पसरली आणि रसिक वाचकांनी प्रदर्शनाला भेट द्यायला सुरूवात केली. गेल्या आठवड्यापासून प्रदर्शनाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून खरेदी वाढली असल्याची माहिती असल्याचे साहित्य यात्राचे व्यवस्थापक शैलेश वाझा यांनी दिली आहे. आतापर्यंत ५ हजार पुस्तकांची विक्री झाली असून वाचकांचा ओघ खरेदीसाठी वाढला आहे. तरुण, महिला, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक सर्व वयोगटांचे नागरिक पुस्तक प्रदर्शनात फिरून पुस्तके चाळताना दिसतात. डोंबिवलीतील या प्रदर्शनात अतिशय कल्पकतेने विषयानुरूप पुस्तकांची मांडणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनात पुस्तक खरेदीवर १० ते २० टक्के सवलत देण्यात आली आहे.
४ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या दिवशी सुरू झालेल्या या ग्रंथोत्सवाची सांगता मराठी भाषा दिनी, रविवार २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर