देशभरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान, मोफत नेत्रचिकित्सा शिबिरे
डोंबिवली
निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त आज देशभरात १६ राज्यांतील ६१ निरंकारी सत्संग भवनांमध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गरजू नेत्र रुग्णांना औषधे व चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तर ज्यांना मोतीबिंदू आढळून आला त्यांना मोफत ऑपरेशनसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. याच शिबिरांपैकी एक शिबिर डोंबिवली संत्संग भवन येथे आयोजित करण्यात आले. त्यामध्ये ईशा नेत्रालयाच्या वतीने नेत्र चिकित्सा करण्यात आली. यावेळी १९० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ज्यांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे त्यांच्यावर ईशा नेत्रालयामध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
या शिबिराचे उदघाटन डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे, सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे, ईशा नेत्रालयचे संतोष घोडेस्वार आणि मंडळाच्या विविध शाखांचे मुखी/प्रबंधक उपस्थित होते.
कोरोना कालखंडात जेव्हा समस्त भारतात इस्पितळांमध्ये ऑक्सीजनची कमतरता निर्माण झाली त्यावेळी संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘वननेस वन परियोजना’ तयार करुन २१ ऑगस्ट, २०२१ रोजी देशातील ३५० ठिकाणी दिड लाख वृक्ष ‘नागरी वृक्ष समूह’ पद्धतीने रोपण केले. तसेच किमान तीन वर्षांसाठी त्यांची देखभाल व रक्षण करण्यासाठी ते दत्तक घेतले आहेत. यावर्षी बाबाजींच्या जन्म दिनाचे औचित्य साधून याच योजनेअंतर्गत आणखी ५० हजार वृक्षांची लागवड देशभरात करण्यात आली.
बाबाजींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून डोंबिवली आणि कल्याण येथे महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर वृक्षारोपणही करण्यात आले. बाबा हरदेवसिंहजी यांनी मिशनमार्फत स्वच्छता अभियानाचे कार्यक्रम सन २००३ पासूनच सुरु केले होते. ‘प्रदूषण आतील असो अथवा बाहेरील, दोन्ही हानीकारक आहेत’ असे त्यांचे घोषवाक्य होते. प्रदूषण नियंत्रणाचा त्यांचा हा दृष्टीकोन लक्षात घेऊन डोंबिवली क्षेत्रात डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, आंबिवली, टिटवाळा, वाशिंद, शहापूर, कसारा, भिवंडी आदी परिसरात १०० हुन अधिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये २८ निरंकारी सत्संग भवन आणि ७० च्या आसपास ज्याठिकाणी सत्संगचे आयोजन केले जाते अशा शाळा, सभागृहे आणि इतर ठिकाणी साफसफाई करण्यात आली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर