ठाणे
दमणवरुन घोडबंदर रोड मार्गे न्हावाशेवा येथे औषधांचे बॉक्स घेऊन निघालेला कंटेनर गायमुख जकात नाकाजवळ उलटल्याची घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. त्या अपघातग्रस्त कंटेनरने अर्धा तास ठाण्याकडे येणारी वाहतुक रोखून धरली. कंटेनर रस्त्याच्या बाजूला केल्यावर घोडबंदर रोडवरील वाहतुक पूर्वपदावर आली. तर कंटेनर चालकाच्या पायाला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
कंटेनर चालक तेजप्रताप प्रजापती हा बुधवारी दमणवरुन न्हावाशेवा येथे १७-टन औषधांचे बॉक्स घेऊन निघाला होता. कंटेनर हा घोडबंदर रोडने जात असताना गायमुख जकात नाका येथे आल्यावर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटून उलटला. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतुकीला ब्रेक बसला. या घटनेची माहिती कळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि कासारवडवली पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारच्या सुमारास जड आणि अवजड वाहतुक सुरू असल्याने तातडीने कासारवडवली वाहतूक पोलिसांनी वाहतुक दुसऱ्या मार्गने वळवून रस्त्यावर उलटलेला कंटेनर रस्त्याच्या एका बाजूला करण्यासाठी क्रेन बोलवून काम पूर्ण केले.
कंटेनर रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर वाहतुक अर्ध्या तासांनी पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली. या घटनेत कंटेनर चालक प्रजापती (४३) याच्या डाव्या पायाला व डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच अपघातानंतर कंटेनरमधील सांडलेल्या तेलावरती माती पसरविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.
या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतुक विभागाने घटनास्थळी धाव घेत, वाहतुक दुसऱ्या मार्गे वळविल्याने काही मिनिटांसाठी वाहतुक कोंडी झाली होती. साधारण अर्ध्या तासानंतर वाहतुक पूर्वपदावर हळूहळू येऊ लागली. उलटलेल्या कंटेनरमध्ये १७ टन औषधांचे बॉक्स होते. – संदीप सावंत, पोलीस निरीक्षक, कासारवडवली वाहतुक उपशाखा.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर