कल्याण
कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उसरघर येथे डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. भरत पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आयआयटी खरगपूरच्या सहाय्याने नॅशनल डिजिटल लायब्ररी सुरू केली असून या लायब्ररीमध्ये भारतातील सर्व भाषांमधील पूर्व प्राथमिकपासून ते उच्च शिक्षणापर्यंतची तसेच कला, साहित्य, शिक्षण, आरोग्य यासोबतच अनेक विविध विषयांची खूप मोठ्या संख्येने पुस्तके उपलब्ध आहेत.
जि. प. शाळा उसरघरने नॅशनल डिजिटल लायब्ररीच्या सदस्यत्वाच्या माध्यमातून उसरघर शाळेत डिजिटल लायब्ररी सुरू करून विद्यार्थ्यांना व शिक्षकांसह ग्रामस्थांना ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून दिला असून उसरघर शाळेतील लायब्ररीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. जि. प. शाळा उसरघर येथील समाजभवन सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. प्राचार्य डॉ. पवार यांनी संगणकावर लॉगीन करून डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन करत डिजिटल लायब्ररी उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण विस्तार अधिकारी विद्या नाईकवाडी यांनी भूषविले. तर उसरघरचे माजी सरपंच क्रांती पाटील, स्वप्ना पाटील आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा विनिता संते आणि केंद्र प्रमुख अशोक पासलकर हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मुख्याध्यापक राहुल परदेशी यांनी डिजिटल लायब्ररीचे महत्व आणि ई बुकचे भविष्यातील स्थान या विषयांवर माहिती दिली. तर शाळेच्या उपशिक्षिका मानसी खंबायत यांनी डिजिटल लायब्ररीचा अध्ययन अध्यापनातील उपयोग या विषयावर माहिती दिली.
राहुल परदेशी यांनी उसरघर शाळा आयएसओ मानांकित करण्याचा आमचा मानस असून पुढील वर्षभराच्या कालावधीत शाळा आयएसओ मानांकित करण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रो फास्ट कन्सल्टन्सी संस्थेचे समन्वयक सहदेव चव्हाण यांनी उसरघर शाळेने आयएसओ मानांकनासाठी नोंदणी केल्याचे जाहिर केले. कार्यक्रमासाठी विषयतज्ञ राम शिरोळे, ठामपा गटप्रमुख राजेंद्र परदेशी, आर. बी. रोझोदकर व सोनारपाडा केंद्रातील शिक्षकवृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याची आवश्यकता असते व त्यासाठीच डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून देत असल्याची माहिती मुख्याध्यापक राहुल परदेशी यांनी दिली आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर