सायबर तज्ञांनी केले “ऑनलाइन होणारी फसवणूक” बाबत मार्गदर्शन
कल्याण
कल्याणमध्ये खडकपाडा पोलिसांनी सायबर क्राईम जनजागृती अभियान राबविले असून सायबर तज्ञ धर्मेंद्र नलावडे यांनी ऑनलाइन होणारी फसवणूक याबाबत मार्गदर्शन केले.
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांची बैठक खडकपाडा पोलीस ठाणे येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांना सहाय्यक पोलीस आयुक्त माने पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार तसेच सायबर तज्ञ धर्मेंद्र नलावडे यांनी ऑनलाइन होणारी फसवणूक याबाबत मार्गदर्शन केले.
फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून उपस्थितांना सायबर क्राईम जनजागृती या विषयांकित छापील सूचना पत्रके वाटप करण्यात आली. या सायबर जनजागृतीबाबत मुख्याध्यापक ते शिक्षक व शिक्षक ते विदयार्थी आणि विद्यार्थी ते इतर पाच नागरिक असा प्रसार करण्यासाठी मुख्याध्यापक यांनी सहकार्य करावे असे मत सहाय्यक पोलीस आयुक्त माने पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या वेळी शाळा, महाविद्यालयाचे ३०ते ३५ मुख्याध्यापक, प्राचार्य उपस्थित होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर