केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह शिवसेनाही मोर्चात सहभागी
कल्याण
रस्त्यात ठिय्या मांडत महाविकास आघाडीने कल्याण पूर्वेत शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह शिवसेनेसह रिपाईचे कार्यकर्तेदेखील मोर्चात सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
कल्याण पूर्व येथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी गणपती मंदिर ते कोळसेवाडी पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढत भाजप सरकारचा निषेध नोंदवला. या मोर्चात भाजपच्या निषेधाचे फलक घेत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन केले. भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला.
या निषेध आंदोलन मोर्चात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, शिवसेनेचे नेते अल्ताफ शेख, कल्याण पूर्व विधानसभा संघटक प्रशांत काळे, शरद पाटील, हर्षवर्धन पालांडे, परिवहन सभापती मनोज चौधरी, शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख विजया पोटे, कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडत नाही म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुउपयोग करून महाविकास आघाडीला केंद्र सरकार घेरण्याचा प्रयत्न करीत आहे, केंद्र शासन आणि त्यांच्या तपास यंत्रणेच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी कल्याण पूर्वेत महाविकास आघाडी सरकारमधील तीन प्रमुख घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढून निषेध व्यक्त करीत निषेधाचे निवेदन कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांचेकडे देण्यात आले.
नवाब मलिक यांना ईडीने हेतुपुरस्कर अटक करून राज्य सरकारला बदनाम करणाचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी केला.
केंद्र शासन आणि ईडी तपास यंत्रणेच्या कोणत्याही दबावाला महाविकास आघाडी बळी पडणार नसल्याचे काँग्रेस (आय) चे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले.
ईडीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या कारवायांना महाविकास आघाडी भिक घालणार नसल्याचे शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा संघटक प्रशांत काळे यांनी सांगितले.
केंद्रीय तपास यंत्रणेचा निषेध करीत ठाकरे सरकार हे जशास तसे उत्तर देत आणखीन खंबीरपणे राज्यातील सत्तेत कायम राहिल असे शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांनी सांगितले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर